... म्हणून युवकाने नितीश कुमारांवर केला हल्ला, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:54 AM2022-03-28T11:54:03+5:302022-03-28T11:56:32+5:30
मुलाच्या कुटुंबीयांनी हा युवक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे सांगितले.
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार यांच्यावर रविवारी एका युवकाने हल्ला केला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये युवकाने त्यांना बुक्का मारला. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशीही करण्यात आली आहे. त्यानंतर, मुलाच्या कुटुंबीयांनी हा युवक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे सांगितले. तसेच, यापूर्वी त्याने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, असे त्याच्या घरच्यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पाटण्यात परतलेले मुख्यमंत्रीनितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यावेळी ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी जात होते. तेवढ्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या युवकाचे नाव शंकर वर्मा ऊर्फ छोटू असून तो मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. छोटूची मानिसक क्षमता ठिक नसून यापूर्वी त्याने 2 ऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. तसेच, एकवेळा आत्महत्या करण्यासाठी फाशीही लावून घेतली होती. छोटूचे लग्न झाले असून त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे. आपल्या दोन मुलांसह ती वेगळं राहत असल्याचंही जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे या युवकावर कुठलिही दंडात्मक कारवाई न करता त्याच्या अडचणीची सोडवणूक करण्याचे, उपचार करण्याचे आदेशच सीएमओ कार्यलयाकडून देण्यात आले आहेत.
...तेव्हाही सुरक्षा रक्षकानं केलं होतं मुख्यमंत्र्यांचं रक्षण -
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान मधुबनी येथे झालेल्या एका निवडणूक सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश यांच्यावर कांदे आणि विट घेऊन हल्ला केला होता. यावेळी मंचावर उपस्थित सुरक्षा रक्षकाने मुख्यमंत्र्यांचे रक्षण केले होते.