भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 08:45 AM2024-05-21T08:45:49+5:302024-05-21T08:46:26+5:30
हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे सिन्हा नाराज झाले होते. तेव्हापासून सिन्हा यांनी पक्षाच्या कामात तसेच उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते.
भाजपच्या गोटातून मोठी बातमी येत आहे. लोकसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज असलेल्या खासदार मंत्री जयंत सिन्हा यांनी पक्षाचा प्रचार तर केला नाहीच परंतु मतदानही केले नसल्याचे समोर येत आहे. यामुळे भाजपाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तसेच यावर दोन दिवसांत उत्तरही मागितले आहे.
हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने मनीष जयस्वाल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे सिन्हा नाराज झाले होते. तेव्हापासून सिन्हा यांनी पक्षाच्या कामात तसेच उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहणे पसंत केले होते. सिन्हा कुठेच दिसले नाहीत. मतदानाच्या दिवशी तरी मतदान करतील अशी अपेक्षा भाजपला होती. परंतु त्यांनी मतदानही केले नाही. यामुळे भाजपाने सिन्हा यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. याचबरोबर भाजपाने आमदार राज सिन्हा यांनाही नोटीस पाठविली आहे.
पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनीष जयस्वाल यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून तुम्ही ना निवडणूक प्रचारात रस घेत आहात ना संघटनात्मक कामात. असे असतानाही लोकशाहीच्या या महान उत्सवात मतदानाचा हक्क बजावणेही तुम्ही योग्य मानले नाही. तुमच्या या वागण्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे, असे या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे. जयंत सिन्हा यांनी तिकीट मिळत नाहीय हे पाहून राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली होती.