तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 10:02 PM2017-12-13T22:02:26+5:302017-12-13T22:03:28+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मोदींनी केलेल्या टीकेला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पदाच्या गरिमेचा विचार न केल्याचा आरोप करणारे मनमोहन सिंग आपल्या कार्यकाळात का विसरले होते, असा सवाल केला आहे.
अमित शहा म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लाखो, कोटींचे घोटाळे होत होते. जेव्हा त्यांचा एक अध्यादेश काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फाडला होता, तेव्हा त्यांना पदाच्या गरिमेचा विचार केला होता का, मनमोहन सिंग यांनी याआधीही गुजराथमध्ये प्रचार केला होता. पण सध्याइतके संतप्त ते कधीही दिसले नव्हते. त्यांचा तो स्वभाव नाही. कदाचित यावेळी पक्षाचा दबाव त्यांच्यावर अधिक असावा.
When Sonia ji called Modi ji 'Maut ka Saudagar' then where was Manmohan Singh ji's advice on use of words and position? Same when Rahul ji tore ordinance. Scam after scam occurred in UPA, then Manmohan ji did not find anything wrong?: Amit Shah pic.twitter.com/1W9Jn8KuZH
— ANI (@ANI) December 13, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत खरमरीत निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात ते म्हणतात की, अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषय कोणी काढला नाही की त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. चर्चा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांपुरतीच मर्यादित होती. त्या बैठकीला जे हजर होते त्यापैकी कोणावरही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकत नाही. गेल्या पाच दशकात मी सार्वजनिक जीवनात राहून देशासाठी केलेली सेवा सर्वज्ञात आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदींसह कोणीही माझ्या देशसेवेविषयी दुरान्वयानेही शंका घेऊ शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी ठामपणे नमूद केले.