...त्यामुळे POK मधले पोहोचले होते अभिनंदन यांचे विमान, समोर आली मोठी गडबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:48 IST2019-09-26T13:43:20+5:302019-09-26T13:48:24+5:30
एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

...त्यामुळे POK मधले पोहोचले होते अभिनंदन यांचे विमान, समोर आली मोठी गडबड
नवी दिल्ली - बालाकोटवरील एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना भारताचे एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. तसेच वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा कंट्रोल रूमकडून पाठवण्यात येत असलेले रेडिओ संदेश अभिनंदन हे सारथ्य करत असलेल्या विमानापर्यंत पोहोचलेच नसल्याची माहिती उघड झाली आहे.
बालाकोटवर एअर स्ट्राइक करून भारतीय हवाई दलाने पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान, भारताचे एक मिग 21 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या विमानातील रेडिओ सिस्टिममध्ये बिघाड झाल्याने कंट्रोल रूमकडून पाठवण्यात येत असलेले संदेश अभिनंदन यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते.
दरम्यान, एअरस्ट्राइकनंतर हवाई दलाच्या उपप्रमुखांनी केंद्र सरकारला या संदर्भातील संपूर्ण अहवाल पाठवला होता. तसेच पूर्ण कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी नेमके काय झाले होते. तसेच भविष्यात असा अपघात होऊ नये यासाठी काय करावे लागेल, याचीही माहिती देण्यात आली होती.
या प्रकारानंतर केंद्र सरकारने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने असा एक प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार डीआरडीओ एक असे उपकरण विकसित करण्यावर संशोधन करणार आहे जे उपकरण लढाऊ विमानात बसलेला वैमानिक आणि कंट्रोल रूम यांच्यातील दुवा असलेला रेडिओ जॅम होऊ देणार नाही.