सरकारनं गाईच्या शेणापासून बनवलेला साबण केला लाँच, एवढी आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:20 AM2019-10-02T11:20:13+5:302019-10-02T11:20:38+5:30
खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो.
नवी दिल्लीः खाण्या-पिण्यापासून शरीराची स्वच्छता राखण्यासाठी अनेकदा रासायनिक प्रक्रियेतून बनवलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो. परंतु सरकारकडून आता निसर्गनिर्मित वस्तू वापरण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केलं जात आहे. आतापर्यंत लोकांनी सुगंधित केमिकलयुक्त साबणाचा वापर केला आहे, परंतु आता जनतेला गाईच्या शेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण वापरता येणार आहे. तुम्ही आता म्हणाल गाईच्या शेणापासून साबण बनवणं कसं शक्य आहे. तर हा साबण खादी ग्रामोद्योग विभागानं बनवलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा साबण लाँच केला आहे.
गायीच्या शेणापासून बनवलेला हा साबण आपल्या खिशावर ओझं टाकणारा आहे. जिथे बाजारात साधा साबण 30-40 रुपयांत मिळतो, तिथे हा गाईच्या शेणापासून बनवलेला साबण 125 रुपयांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा साबणाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. तुमची त्वचाही नैसर्गिकरीत्या तजेलदार राहणार आहे. गाईच्या शेणापासून बनवलेल्या साबणाच्या उद्धाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खादी ग्रामोद्योगासाठी येत्या दोन वर्षांत 10 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचाही प्रस्ताव ठेवला आहे. गडकरींनी या साबणासोबतच एका पाण्याच्या बोटलचंही अनावरण केलं आहे.