गाढविनीच्या दुधापासून बनलेला साबण महिलांना सुंदर ठेवतो; मनेका गांधींनी सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:55 PM2023-04-02T13:55:08+5:302023-04-02T13:55:42+5:30
किती दिवस झालेत आपल्याला गाढव पाहून. धोब्याचे काम संपले आहे असे सांगत मनेका गांधी यांनी एका प्रसिद्ध राणीचे उदाहरण दिले.
माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या एका बैठकीला संबोधित करताना गाढविनीच्या दुधापासून बनविलेला साबण महिलेच्या शरीराला नेहमी सुंदर ठेवतो, असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले आहे.
क्लिओपात्रा नावाची एक प्रसिद्ध राणी होऊन गेली. ती गाढविनीच्या दुधाने अंघोळ करायची. यामुळे ती सुंदर दिसायची. दिल्लीत या दुधापासुन बनविलेला साबण ५०० रुपयांना विकला जातो. मग का नाही आपण बकरीच्या दुधाचा साबण बनवुयात, सोबतच गाढवाच्या दुधापासूनही साबण बनवू, अशी कल्पना मनेका गांधी यांनी जमलेल्या नागरिकांना दिली.
बल्दीरायमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या असे सांगितले जात आहे. लडाखमध्ये एक समाज आहे, त्यांना गाढवांची संख्या कमी होत असल्याचे वाटले. किती दिवस झालेत आपल्याला गाढव पाहून. धोब्याचे काम संपले आहे. त्या लोकांनी गाढविनीचे दुध काढण्यास सुरुवात केली. त्यापासून त्यांनी साबण बनविला. हा साबण महिलांचे शरीर नेहमी सुंदर ठेवतो, असे मनेका म्हणाल्या.
मनेका गांधी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. आजपर्यंत शेळ्या, गायी पाळून कोणीही श्रीमंत झालेले नाही. सुलतानपूरमध्ये 25 लाख लोकांमागे 3 डॉक्टर असतील. गाय आजारी पडली, म्हैस आजारी पडली, शेळी आजारी पडली, तर तुमचे लाखो रुपये गेले. यामुळे शेळीपालन, गायपालन करण्यास माझा विरोध आहे. दहा वर्षे कमवाल आणि एका रात्रीत मरून जाईल, जनावरासोबत सारे संपून जाईल, असे त्या म्हणाल्या.