राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया! मीम्सचा वापर, निवडणूक आयाेगही अग्रेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:30 AM2024-04-20T07:30:15+5:302024-04-20T07:30:34+5:30
निवडणुकीत राजकीय आखाडा बनला साेशल मीडिया
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष, उमेदवार तसेच सर्वसामान्य जनतेने साेशल मीडियाचा पुरेपूर वापर केला आहे. प्रतिस्पर्ध्यांवर टीका करण्यापासून ते मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारच्या मीम्सचा वापर झाला. त्यात केवळ विनाेदी नव्हे, तर लाेकप्रिय चित्रपटांमधील गाजलेले संवाद किंवा दृष्यांचा वापरही करण्यात आला. अशा भन्नाट मीम्सने साेशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आयाेगाने साेशल मीडियाचा पुरेपूर वापर केलेला दिसताे. आयाेगाने ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील एका दृष्याचा फाेटाे वापरुन नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. शुक्रवारी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. मतदान केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये मतदान केल्याचे फाेटाे टाकण्याची स्पर्धाच टाकली. काेणी स्वत:चे, मित्रमंडळींचे तसेच मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांचे फाेटाे टाकले. यात तरुणांचा माेठा उत्साह हाेता.
भाजप, काॅंग्रेस, आप, डीएमके, इत्यादी राजकीय पक्षांनीही विविध मीम्सच्या मालिकांद्वारे प्रचार केला. प्रतिस्पर्ध्यांवर कुरघाेडी तसेच टीका करण्याची संधी साेशल मीडियावर साेडली नाही.
टाॅलिवूड आघाडीवर
- अभिनेत्री त्रिशा कृष्णन, अभिनेता विजय थलपती, सूर्या यांच्यासह अनेक दिग्गज तमिळ अभिनेत्यांनी मतदान करुन फाेटाे साेशल मीडियावर टाकले.
- मतदान केंद्रांवर त्यांना पाहण्यासाठीही गर्दी झाली. या सेलिब्रिटींनी लाेकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.