अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 11:23 AM2022-10-30T11:23:10+5:302022-10-30T11:25:02+5:30

दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे.

Social Media 'Tool' for Terrorist; Foreign Minister S. Jaishankar's warning at the United Nations CTC meeting | अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

Next

नवी दिल्ली : समाजमाध्यमांचे प्लॅटफॉर्म्स दहशतवादी गटांसाठी सक्षम ‘टुल किट’ साधने बनत आहेत, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘दहशतवादविरोधी समिती’च्या (सीटीसी) विशेष बैठकीत ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा बैठकीचे आयोजन भारतात प्रथमच करण्यात आले आहे.  

जयशंकर यांनी सांगितले की, दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे. या शक्ती नवे तंत्रज्ञान आणि क्रिप्टो चलनाचा वापर करीत आहेत. समाजांना अस्थिर करण्यासाठी तसेच कट्टरता पसरविण्यासाठी ते खोटा प्रचार आणि कटकारस्थानांचा आधार घेत आहेत. ड्रोनसारख्या अत्याधुनिक मनुष्यविरहित हवाई यंत्रणांचा वापरही ते करीत असून ही अधिक चिंतेची बाब आहे.

पाकिस्तानचे थेट नाव न घेता जयशंकर यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मागील २ दशकांत महत्त्वपूर्ण यंत्रणा उभी केली. दहशतवादविरोधी निर्बंधांच्या पायावर उभी असलेली ही यंत्रणा दहशतवादाला राज्याचे धारेण म्हणून राबविणाऱ्या देशांना इशारा देण्यास सक्षम आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तथा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला अजूनही शिक्षा झालेली नाही, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

२६/११ हल्ला खटल्यासाठी हवा मजबूत पुरावा : पाकचा पुन्हा कांगावा

एस. जयशंकर यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत आहे. मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी मजबूत पुरावा हवा.

कृती आवश्यक - 

अँटोनिओ ग्युटेरस लोकांना कट्टरपंथी बनविण्यासाठी तसेच समाजात अशांतता पसरविण्यासाठी विविध दहशतवादी गटांकडून होणारा तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व जगाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरस यांनी केले. बैठकीला उद्देशून पाठविलेल्या भाषणात ग्युटेरस म्हणाले की, काही घातक शक्ती, दहशतवादी गट नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत आहेत. त्याविरुद्ध संपूर्ण जगाने सामूहिकरीत्या उभे राहण्याची गरज आहे.

Web Title: Social Media 'Tool' for Terrorist; Foreign Minister S. Jaishankar's warning at the United Nations CTC meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.