पासपोर्ट अर्जदारांचा साेशल मीडिया तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 02:52 PM2021-02-05T14:52:31+5:302021-02-05T14:52:58+5:30
passport applicants : उत्तराखंडात आता पासपोर्ट अर्जदारांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडिया व्यासपीठाचा दुरुपयोग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
डेहराडून - उत्तराखंडात आता पासपोर्ट अर्जदारांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडिया व्यासपीठाचा दुरुपयोग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली.
उत्तराखंड पोलिसांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पासपोर्ट अर्जदाराच्या पोलीस सत्यापन प्रक्रियेवेळी सोशल मीडिया पोस्टचाही तपास करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे समर्थन करताना पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे की, सोशल मीडियाचा वाढता दुरुपयोग रोखण्यासाठी हा उपाय करण्यात येणार आहे. तथापि, एखाद्या नवीन कठोर पावलाची ही सुरुवात आहे, याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, ही तरतूद आधीच केलेली आहे, ती फक्त आता लागू करण्यात आली आहे.
पासपोर्ट कायद्यात म्हटले आहे की, राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला पासपोर्ट जारी करण्यात येऊ नये. मी केवळ त्याची अंमलबजावणी करीत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी हे पाऊल गरजेचे आहे, असेही पोलीस महासंचालकांनी सांगितले.