‘सीएसआरद्वारे सामाजिक क्षेत्राला मिळणार २0 हजार कोटी रुपये’
By admin | Published: April 29, 2015 11:31 PM2015-04-29T23:31:27+5:302015-04-29T23:31:27+5:30
कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) योजनेंतर्गत सामाजिक क्षेत्रासाठी सुमारे २0 हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील,
नवी दिल्ली : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) योजनेंतर्गत सामाजिक क्षेत्रासाठी सुमारे २0 हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. या निधीचा सुयोग्य वापर व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भारतीय उद्योग परिसंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सीएसआर संमेलन-राष्ट्रीय अजेंड्यात भागीदार’ या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.
२0१३ सालच्या कंपनी कायद्यानुसार, नफा कमावणाऱ्या विशिष्ट श्रेणीतील कंपन्यांना आपल्या तीन वर्षांच्या सरासरी शुद्ध नफ्याच्या २ टक्के रक्कम सामाजिक कार्यावर खर्च करावी लागणार आहे. यालाच सीएसआर असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी म्हटले की, सीएसआरच्या माध्यमातून प्रचंड मोठी रक्कम सामाजिक क्षेत्रासाठी उपलब्ध होणार आहे. सुमारे ८,000 कोटी ते २0,000 कोटींपर्यंत हा आकडा असू शकतो. कंपन्यांना केवळ शेअरधारकांच्या हिताचीच जबाबदारी आहे, ही भूमिका आता मागे पडली आहे. कंपन्यांची जबाबदारी त्याही पलीकडची आहे. कंपन्यांना मिळणारा पैसा हा शेवटी समाजातूनच येत असतो. त्यामुळे समाजाविषयीही कंपन्यांनी जबाबदारी घ्यायला हवी,
ही सीएसआरमागील मुख्य भूमिका आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४सीएसआर नियम कंपनी कायद्याचाच एक भाग आहे. गेल्यावर्षी १ एप्रिलपासून ते लागू करण्यात आले आहेत. कंपनी व्यवहार सचिव अंजुली छिब दुग्गल यांनी सांगितले की, सीएसआरअंतर्गत कोणत्या सामाजिक उपक्रमांवर निधी खर्च करायचा याची यादी नियमावलीत देण्यात आली आहे. तथापि, याव्यतिरिक्तची आणखी काही कामे सीएसआरमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.