समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:25 AM2024-03-09T06:25:43+5:302024-03-09T06:26:44+5:30
सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, स्त्रीशक्तीने देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नवी दिल्ली : ख्यातनाम उद्योजिका, लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती (वय ७३ वर्षे) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याबद्दल मूर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत.
सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, स्त्रीशक्तीने देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘आश्चर्याचे दोन धक्के’
सुधा मूर्ती यांनी सांगितले की, राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड होणे व त्याची घोषणा आंतरराष्ट्रीय महिलादिनी होणे हे माझ्यासाठी आश्चर्याचे दोन धक्के आहेत. राज्यसभेवर निवड होईल, असा मी कधी विचारही केला नव्हता.