समाजवादी कुटुंबातील ‘यादवी’

By admin | Published: September 21, 2016 08:15 PM2016-09-21T20:15:00+5:302016-09-21T20:15:00+5:30

उत्तर प्रदेशाचे राजकारण सध्या यादव कुटुंबातील कुरबुरीने ढवळून निघत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये कौटुंबिक कलह उफाळून आला

Socialist family 'Yadavee' | समाजवादी कुटुंबातील ‘यादवी’

समाजवादी कुटुंबातील ‘यादवी’

Next

असिफ कुरणे

कोल्हापूर, दि. २१ - उत्तर प्रदेशाचे राजकारण सध्या यादव कुटुंबातील कुरबुरीने ढवळून निघत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये कौटुंबिक कलह उफाळून आला असून, पक्षात यादवी माजण्याची वेळ आली होती. पण, सध्या तरी काका-पुतण्याच्या वादात सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या कठोर भूमिकेने मुख्यमंत्री अखिलेश यांनी थोडे नमते घेतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा कौटुंबिक कलह समाजवादी पक्षाची परीक्षा घेणारा ठरणार आहे.

वादाची ठिणगी
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अखिलेश यादव यांनी मुख्य सचिव दीपक सिंघल यांना पदावरून हटविले. अवघ्या दोन महिन्यांत त्यांना पदावरून हटविण्यात आले. सिंघल हे अमरसिंग यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनीच मुलायमसिंग यांच्यामार्फत सिंघल यांची मुख्य सचिवपदी वर्णी लावली होती. अखिलेश यांनी खाण भ्रष्टाचार प्रकरणात ठपका ठेवलेले खाण मंत्री गायत्री प्रजापती आणि राजकिशोर सिंग या वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी केली. हे दोघे शिवपाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षप्रमुख मुलायमसिंग यांनी अखिलेश यांच्याकडील राज्य पक्षाध्यक्ष पद काढून घेत त्या ठिकाणी शिवपाल यांची नेमणूक केली. या घटनेने हादरलेल्या अखिलेश यांनी तत्काळ शिवपाल यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली. एकप्रकारे मुलायमसिंग यांना हे आव्हानच म्हटले जाते.

कोणासोबत कोण :
उत्तर प्रदेशाच्या राजकारणात यादव कुटुंबाचे मोठे प्रस्थ आहे. पक्षाचे पाचही खासदार हे घरांतील लोकच आहेत. अखिलेश आणि शिवपाल यांच्या वादात सध्याच्या स्थितीला दोन गट पडल्याचे चित्र आहे. अखिलेश यांच्यासोबत पक्षातील युवा कार्यकर्ते आणि जवळपास १५० आमदार सोबत असल्याचा दावा केला जातो, तर शिवपाल यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीला जवळपास १०० आमदार आणि काही मंत्री उपस्थित असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात.

ही तर फक्त सुरुवात
निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना यादव कुटुंबातील हा वाद तूर्तास थांबला असला तरी शमलेला नाही. निवडणूक जशी जवळ येईल तसा हा वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. सध्याचे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण बघता कोणताही पक्ष आपण सत्तेत येऊ असा ठामपणे दावा करू शकत नाही. अशी परिस्थिती असताना अखिलेश, शिवपाल यांना आपले सामर्थ्य वाढवीत मुख्यमंत्री पदावर दावा कायम ठेवायचा आहे. अमरसिंग शिवपाल यादव यांना मुख्यमंत्री करून समाजवादी पक्षातील आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करू इच्छित आहेत. तर अखिलेश काकाच्या भ्रष्ट प्रतिमेपासून लांब राहत स्वच्छ प्रतिमेच्या बळावर सत्ता कायम ठेवू पाहत आहेत. त्यासाठी पक्षाध्यक्षपद आपल्याकडेच हवे असे त्यांनी वडील मुलायमसिंग यांना सांगितले आहे. एवढी यादवी माजली असताना हे कुटुंब भविष्यात गुण्यागोविंदाने राहतील, अशी आशा करणे गैरलागू ठरेल.

वादाचे कारण काय ?
मुख्यमंत्री अखिलेश आणि काका ज्येष्ठ मंत्री शिवपाल यादव यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आलबेल नसल्याच्या बातम्या चर्चेत येत होत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पकड असलेल्या शिवपाल यांनी जून महिन्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या पार्श्वभूमीवर कौमी एकता दलाचे मुख्तार अन्सारी यांना पक्षात घेतले. त्यांचा पक्ष सपामध्ये विलीन होणार होता. हा निर्णय अखिलेश यांना मान्य नव्हता.

त्यांनी याला विरोध केला. अवघ्या २४ तासांत या घडामोडी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या बलराम यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. या घटनेने काका - पुतण्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

याआधीसुद्धा शिवपाल यादव अखिलेश सरकार उत्तर प्रदेशात कायदा व्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याच्या बातम्या माध्यमात पेरण्यात सक्रिय असल्याचा आक्षेप घेतला जात होता.

अमरसिंग यांना पक्षात परत घेणे आणि त्यांना राज्यसभा सदस्य करण्यालासुद्धा अखिलेश यांचा विरोध होता. अमरसिंग यांनी शिवपाल यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी खटपटी करीत असल्याची चिंता अखिलेश यांच्या गोटातून व्यक्त होते.

अखिलेश यांनी घेतले नमते
काका-पुतण्यामधील वाद वाढल्याने पक्षप्रमुख मुलायम सिंग यांना या प्रकरणात उडी घ्यावी लागली. त्यांनी यावेळी शिवपाल यांची पाठराखण करीत अखिलेश यांना आपले निर्णय मागे घ्यावयास भाग पाडले. शिवपाल यांना सार्वजनिक बांधकाम वगळता इतर सर्व खाती द्यावी लागली. तसेच गायत्री प्रजापती आणि राजकिशोर या मंत्र्यांनादेखील मंत्रिमंडळात घ्यावे लागले. दीपक सिंघल यांना मात्र मुख्य सचिवपद न देता त्यांच्या जागी राहुल भटनागर यांची नेमणूक करण्यात अखिलेश यांना यश आले आहे.

वर्चस्वाची लढाई
अखिलेश यादव यांची साडेचार वर्षांची कारकीर्द तशी चांगलीच म्हणावी लागेल. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही. आपली स्वच्छ प्रतिमा त्यांनी कायम राखली आहे. आगामी निवडणुकीत विकासातून विजयाकडे जाण्याचा त्यांचा मनसुबा आहे. पण, पक्षात एक गट आपल्याला हटविण्याच्या तयारीत असल्याची चिंता त्यांना सतावत आहे.
२०१७ मध्ये समाजवादी पक्षाची सत्ता आल्यास आपल्याऐवजी शिवपाल यादव यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, असे त्यांना वाटते. अमरसिंग आणि शिवपाल गट निवडणूक तिकीट वाटपात आपल्या समर्थकांना तिकीट वाटप करीत आपल्याला अडचणीत आणत असल्याचा अखिलेश यांच्या समर्थकांचा दावा. अखिलेश यांचे समर्थक असलेल्या आजम खान या मुस्लिम चेहऱ्याला पर्याय देण्यासाठी मुख्तार अन्सारी आणि बंधूंना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला.
या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपाचे हक्क आपल्याच हाती असावेत, असा अखिलेश यांचा हट्ट होता. पण, मुलायमसिंग यांनी सध्या तरी राज्य पक्षाध्यक्षपद शिवपाल यादव यांना दिले आहे.


अखिलेश गट
डिंपल यादव, रामगोपाल यादव (सरचिटणीस), अक्षय राजगोपाल यादव, धर्मेंद्र यादव, तेजप्रताप यादव ( सर्व खासदार ), आजम खान

शिवपाल गट
प्रतीक यादव ( अखिलेश यांचे सावत्र भाऊ), अपर्णा यादव ( प्रतीक यांची पत्नी), अमरसिंग

Web Title: Socialist family 'Yadavee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.