समाजवादी ‘डोंगर म्हातारा झाला’
By admin | Published: February 16, 2017 12:50 AM2017-02-16T00:50:20+5:302017-02-16T00:50:20+5:30
पंतप्रधान मोदी व बसपाच्या मायावती यांच्यासह सर्वच विरोधकांनी येथील समरांगणात समाजवादी आणि काँग्रेसची तरुण पिढी मुख्य स्पर्धेत आहे
सुरेश भटेवरा / इटावा
पंतप्रधान मोदी व बसपाच्या मायावती यांच्यासह सर्वच विरोधकांनी येथील समरांगणात समाजवादी आणि काँग्रेसची तरुण पिढी मुख्य स्पर्धेत आहे, ही बाब मान्य केली आहे. अमित शाहसह भाजपचे अन्य प्रचारकांच्या हल्ल्याचा रोखही अखिलेश व राहुल गांधींवर आहे. कौटुंबिक अंतर्कलहाच्या संदिग्ध वातावरणात अखिलेशना राहुल गांधींची साथ मिळाली. सारे चित्रच बदलून गेले.
सपात अचानक जोश संचारला. मरगळलेल्या काँग्रेसजनांच्या आशेला पालवी फुटली. पण पंचाईत झाली ती मुलायमसिंगांची. शनिवारी पहिल्या टप्प्याचे अन् बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले. गोंधळलेल्या मुलायमसिंगांना मात्र भाऊ शिवपाल यादव व मुलगा अखिलेश यापैकी कोणाच्या पाठिशी उभे रहावे, हा पेच अद्याप सोडवता आलेला नाही.
राजकीय मजबुरीमुळे अखिलेशचे समर्थक नेताजींचे नाव आदराने घेतात. मात्र स्वत:ला डॉ. राममनोहर लोहियांचा शिष्य मानणाऱ्या मुलायमसिंगांच्या व्यक्तिमत्वाचा डोंगर म्हातारा झाला आहे, याची जाणीव सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसते आहे.
इटावाच्या जसवंतनगरात शिवपाल उमेदवार आहेत. अखिलेशशी त्यांचे पराकोटीचे वैर. तिथे बंधू शिवपालच्या सभेत, सपातील सारे चढउतार नमूद करताना, चौधरी चरणसिंग, कर्पुरी ठाकुर, जनेश्वर मिश्रांसारख्या दिवंगत नेत्यांचे दाखले देत काहीशा असहाय मन:स्थितीत मुलायमसिंग बोलले... ‘‘मुलगा आणि भाऊ दोघेही माझेच. सरकारही मीच उभ्या केलेल्या सपाचे. अशा स्थितीत तुम्हीच मला सांगा, मी काय करू? जनहिताच्या कामांसाठी मलाही आपल्याच सरकारवर अनेकदा दबाव आणावा लागला. याच जसवंतनगराने मला सात वेळा निवडून दिले, देशात राजकारणाच्या शिखरावर पोहोचवले. स्वकियांनी दगाबाजी केली नसती, तर कदाचित पंतप्रधान झालो असतो. (मग मध्येच थांबून) एक प्रकारे बरेच झाले की मी पंतप्रधान झालो नाही, अन्यथा आज माजी पंतप्रधानांच्या रांगेत कुठेतरी बसलेलो दिसलो असतो अन् बहुदा राजकीय रणांगणातूूनही बाहेर पडावे लागले असते. (श्रोत्यांमधे हास्याची करूण लकेर) काही अप्रिय प्रसंगांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र तुम्हाला मी एकच आवाहन करीन की राजकारणात काहीही झाले तरी खंबीर मनाने एकजूट कायम ठेवा. शिवपालला इतक्या विक्रमी मतांनी विजयी करा की विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या पाहिजेत.
मुलायमसिंग म्हणतात : ‘मतदारसंघातील समस्या व विकासाशी शिवपाल इतका एकरूप झालेला आहे की, कोणत्याही नेत्याला या तुलनेचे काम उभे करता आलेले नाही.’