फटाक्यांमध्ये समाजवादी रॉकेट, मायावती बॉम्ब
By admin | Published: October 30, 2016 02:04 AM2016-10-30T02:04:41+5:302016-10-30T02:04:41+5:30
उत्तर प्रदेशातील फटाका बाजारात यंदा समाजवादी रॉकेट आणि मायावती बॉम्बचा जोर आहे. निवडणूकपूर्व रणधुमाळीने राज्य ढवळून निघाले असताना दिवाळीचा फटाका बाजार त्याला
लखनौ : उत्तर प्रदेशातील फटाका बाजारात यंदा समाजवादी रॉकेट आणि मायावती बॉम्बचा जोर आहे. निवडणूकपूर्व रणधुमाळीने राज्य ढवळून निघाले असताना दिवाळीचा फटाका बाजार त्याला अपवाद कसा ठरेल? हा बाजारही राजकीय दारूगोळा ठासून भरलेल्या फटाक्यांनी सजला आहे.
‘समाजवादी रॉकेट’च्या पाकिटावर सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांचे छायाचित्र असून, ते अमरसिंह यांना मिठाई भरवत आहेत. सपात सुरू असलेल्या धुमश्चक्रीला अमरसिंह जबाबदार असल्याचे पक्षाचा एक गट मानतो. फटाका बाजारात बसपाप्रमुख मायावतीही मागे नाहीत. फटाका निर्मात्यांनी त्यांच्या नावाचा बॉम्ब बाजारात आणला असून, त्यावर मायावतींचे चित्र आहे. हा बॉम्ब निवडणुकीत वाजतो की, फुसका ठरतो हे समजण्यास वेळ असला तरी सध्या या बॉम्बला बाजारात मागणी आहे हे नक्की. ‘अखिलेश की लड़ी अनलिमिटेड’ नावाचाही एक फटाका असून तोदेखील बाजारात लोकप्रिय ठरला आहे. हा फटाका म्हणजे एक हजार छोट्या फटाक्यांची लड आहे. या लडीच्या पाकिटावर लोकप्रिय मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या युवकांसोबतचा फोटो आहे.
चांगली मागणी
२०१७ मधील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या फटाक्यांना चांगली मागणी असून, युवकांसह नेतेमंडळीही आवडीने हे फटाके खरेदी करीत आहेत, असे हजरतगंज येथील एका फटाका विक्रेत्याने सांगितले.
समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुलायम यांचे कुटुंब यंदाची दिवाळी एकत्रितपणे साजरी करील की नाही याबाबत चर्चा झडत आहे.
होळी आणि दिवाळीच्या वेळी संपूर्ण मुलायम कुटुंब सैफई येथे एकत्र येते. विवाह, साखरपुडा आणि घरभरणी, अशा कार्यक्रमांवेळी कुटुंबातील सर्व लोक एकत्र येतात.