मुलापुढे मुलायम झुकले

By admin | Published: January 1, 2017 04:16 AM2017-01-01T04:16:06+5:302017-01-01T04:16:06+5:30

पक्षातून हकालपट्टी केलेले आपले चिरंजीव आणि मुख्यमंत्री अखिलेश यांच्यामागे पक्षाचे बहुसंख्य आमदार आहेत या वास्तवाची जाणिव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम

Soft tilts | मुलापुढे मुलायम झुकले

मुलापुढे मुलायम झुकले

Next

लखनऊ : पक्षातून हकालपट्टी केलेले आपले चिरंजीव आणि मुख्यमंत्री अखिलेश यांच्यामागे पक्षाचे बहुसंख्य आमदार आहेत या वास्तवाची जाणिव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव शनिवारी भानावर आले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहकलहाचे कोलीत भाजपाच्या हाती देण्याऐवजी त्यांनी नमते घेणे पसंत केले. अखिलेश आणि राज्यसभा सदस्य असलेले आपले बंधु रामगोपाल यादव यांची पक्षातून केलेली बडतर्फी मुलायम यांनी तात्काळ मागे घेतली आणि ममाजवादी पक्षाच्या यादव कुळात शिगेला पोहोचलेली यादवी २४ तासांत शमली.
विधानसभा निवडणुकीसाठी मुलायम सिंग यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यांनी स्वत:ची स्वतंत्र यादी जारी केली आणि संतापलेल्या ‘नेताजीं’नी मुलासह आपल्या बंधुंचीही गय न करता दोघांचीही सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचे शुक्रवारी जाहीर केले होते. परंतु शनिवारी सकाळी आधी जाहीर केल्याप्रमाणे अपल्या निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला सपाचे २२९ पैकी २०० आमदार हजर होते. दुसरीकडे रामगोपाल यांनी रविवारी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लोहिया विद्यापीठात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. परंतु पक्ष उभारणीत संपूर्ण हयात खर्च केलेल्या मुलायम सिंग यांनी गृहकलहापायी पक्ष खड्ड्यात न जाऊ देण्याचा पोक्तपणा दाखवला.
अखिलेश यांच्या घरची आमदारांची बैठक होताच पक्ष पातळीवर लगोलग अनेक बैठका झाल्या. माघारीची घोषणा मुलायम यांनी स्वत: न करता आपले दुसरे बंधू व सपाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंग यादव यांच्यामार्फत केली. अखिलेश आणि रामगोपाल यांच्या बडतर्फीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याचा आदेश ‘नेताजीं’नी दिला अहे, असे शिवपाल यांनी मुलायम यांना भेटून आल्यानंतर जाहीर केले.
आम्ही सर्वजण नेताजींसोबत एकत्र बसू व त्यानंतर कोणताही वाद शिल्लक राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या समेटानंतर पक्षाच्या उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांत सपामध्ये मुलायम आणि शिवपाल विरुद्ध अखिलेश व रामगोपाल असे तट पडून अनेकवेळा जाहीर तणातणी झाली. प्रत्येक वेळी परस्परांवर आगपाखड करून झाल्यावर समेट झाल्याचे भासविले गेले. आताचे मनोमिलनही कितपत टिकते आणि टिकले तरी सपा भाजपाचे तगडे आव्हान कितपत पेलू शकते हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. (वृत्तसंस्था)

पक्षातील सर्व वादविवाद
संपले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र बसू व सांप्रदायिक शक्तींशी एकदिलाने लढून राज्यात पुन्हा सपाचे सरकार आणू.
- शिवपाल
यादव

सपामधील वादावर पडदा पडल्याने विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी पडले आहे. मुलायम सिंग यांच्या प्रगल्भतेने व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
-अमर सिंग,
सरचिटणीस, सपा

हा वाद चिघळला असता तर मोठी पंचाईत झाली असती व उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांचे विबाजन झाले असते. आता तसे नक्कीच होणार नाही याची आनंद आहे.
-आझम खान, सपाचे
ज्येष्ठ नेते व संस्थापक सदस्य

Web Title: Soft tilts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.