मुलायमचा यू-टर्न!
By admin | Published: January 10, 2017 01:33 AM2017-01-10T01:33:02+5:302017-01-10T01:33:02+5:30
समाजवादी पार्टी एकसंघ असून फूट पडण्याचा प्रश्न नाही, सत्ता आल्यास अखिलेश हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम
पाटणा/ नवी दिल्ली : समाजवादी पार्टी एकसंघ असून फूट पडण्याचा प्रश्न नाही, सत्ता आल्यास अखिलेश हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम दावा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुुलायम सिंह यादव यांनी केला. आमच्या दोघांत कोणताही वाद वा मतभेद नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
माझ्या मुलाला फितविण्यामागे एक-दोन व्यक्ती आहेत. त्यामुळेच पक्षात पेच निर्माण झाला. उमेदवारांच्या फॉर्म ए आणि बी’वर माझीच सही असेल, असा ठाम दावाही मुलायमसिंह यांनी केला.
अखिलेश गटाने ‘सायकल’ या चिन्हाबाबत लवकर निर्णय घेण्याचे साकडे निवडणूक आयोगाला घातले, तर मुुलायमसिंह यांनी मी समाजवादी पार्टीचा सर्वेसर्वा असल्याचा पुनरूच्चार केल्यानंतर समाजवादी पार्टीतील गटबाजी आणखी पराकोटीची सीमा गाठते की काय? अशी शक्यता निर्माण झालेली असतांना मुलायम सिंह यांनी उपरोक्त विधान केले.
दुसरीकडे, सोमवारी वेगाने राजकीय हालचाली घडल्या. अखिलेश गटाने ‘सायकल’ चा वाद तातडीने निकाली काढला जावा, म्हणून निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज
दाखल करण्याची प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरु होत असल्याचे ‘सायकल’ वादावर तातडीने निर्णय घ्यावा, असे साकडे रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाला घातले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार नरेश अग्रवाल आणि नीरज शेखर होते. अखिलेश सुद्धा दिल्लीला जाणार होते; परंतु, शेवटच्या क्षणी बेत रद्द केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इवल्याशा आदिती अन् टीनाची शिष्टाई...
पिता-पूत्रातील राजकीय संघर्षामुळे दुरावा निर्माण झालेला असतांना अखिलेश यांच्या दोन कन्या आदिती आणि टीना या दोघांत दिलजमाईचा ईवलासा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी मुुलायमसिंह टीनाला चिडवत म्हणाले की, तुझे वडील (अखिलेश) खूपच जिद्दी आहेत. टीनाने लगेच हे वडीलांना कळवले. त्यावर अखिलेश जाम हसले.
राज्यसभा सभापतींना पत्र...
रामगोपाल यादव यांना पक्षातून व राज्यसभेतील पक्षनेते पदावरून हटविण्यात आल्याचे मुलायम यांनी सभापती हमीद अन्सारी यांना लेखी कळविले. त्यांना सभागृहातील मागच्या बाकावर आसन द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.