भीषण! भयावह!! दुचाकीस्वार अभियंत्याला बसनं चिरडलं; थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:00 AM2021-11-02T10:00:06+5:302021-11-02T10:03:30+5:30
अभियंता ठरला खड्ड्याचा बळी; भीषण अपघात रस्त्याशेजारील सीसीटीव्हीत कैद
चेन्नई: तमिळनाडूची राजधानी चेन्नईत एक भीषण अपघात झाला आहे. बसनं चिरडल्यामुळे एका सॉफ्टवेअर अभियंत्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खड्ड्यामुळे तोल गेल्यानं दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला आणि बसच्या मागच्या चाकाखाली आला.
चेन्नईच्या चिन्नामलाई परिसरात सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी हा अपघात घडला. मोहम्मद युनूस असं सॉफ्टवेअर अभियंत्याचं नाव असून तो ३२ वर्षांचा होता. मोहम्मद नंगानाल्लूरचा रहिवासी होता. रस्त्याच्या मध्ये एक खड्डा होता. त्यात पावसाचं पाणी साचलं होतं. दुचाकीचं चाक खड्ड्यात जाताच मोहम्मदचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी दुचाकीजवळून जात असलेल्या बसनं मोहम्मदला चिरडलं. या अपघातात मोहम्मदचा मृत्यू झाला.
खड्ड्यामुळे सॉफ्टवेअर अभियंत्याचा अपघात; बसखाली आल्यानं जागीच मृत्यू https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/6ow7IRlZGs
— Lokmat (@lokmat) November 2, 2021
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मोहम्मद युनूसचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह मोहम्मदच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. बसंत नगरहून चिन्नामलाईला जाणाऱ्या बसखाली आल्यानं मोहम्मदचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघातानंतर प्रशासनानं लगेचच रस्त्यावरील खड्डा बुजवला. मात्र हाच खड्डा आधी बुजवला गेला असता, तर अभियंत्याचे प्राण वाचले असते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.