सोहराबुद्दीन शेख चकमक : अमित शहा गोत्यात येणार? सीबीआयविरोधात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 07:48 PM2018-01-19T19:48:32+5:302018-01-19T19:53:45+5:30
अमित शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई: सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सीबीआयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमित शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकिलांच्या एका संघटनेच्या वतीने मुंबई हायकोर्टात शुक्रवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.
हायकोर्टानेच सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या याचिकेवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अहमद आबिदी यांनी सांगितलं. गुजरातमधील या बहुचर्चित प्रकरणात शहा यांच्याशिवाय गुजरात पोलिसांच्याही अनेक अधिका-यांची नावं समोर आली होती. कनिष्ठ न्यायालयाने अमित शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त केले आहे पण सीबीआयने त्याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची अपेक्षा असताना सीबीआयने त्या निर्णयाला आव्हान दिले नाही, त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
- सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी हैदराबादहून महाराष्ट्रातील सांगली येथे जात असताना अपहरण झाले होते. एटीएसने हे अपहरण केल्याची चर्चा होती.
- सोहराबुद्दीन शेख याचे पाकिस्तान येथील लश्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंध होते असा त्यावेळी दावा करण्यात आला होता.
- नोव्हेंबर 2005 मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिलाही मारण्यात आल्याचे बोलले जात होते.
- या घटनेच्या वेळी अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते. या दोन्ही बनावट चकमकींत अमित शहा हे सहभागी असल्याचा आरोप होता. याप्रकरणी सीबीआयने त्यांना जुलै 2010 मध्ये अटकही केली होती.
- त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता.
- डिसेंबर 2014 मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.