सोहराबुद्दिन बनावट चकमक - डी. जी. वंजारा यांना जामिन मंजूर
By admin | Published: September 11, 2014 04:59 PM2014-09-11T16:59:07+5:302014-09-11T16:59:07+5:30
सोहराबुद्दिन बनावट चकमकीमध्ये मुख्य आरोपी असलेले गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा यांना मुंबई हायकोर्टाने गुरुवारी जामिन मंजूर केला आहे.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ - सोहराबुद्दिन बनावट चकमकीमध्ये मुख्य आरोपी असलेले गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा यांना मुंबई हायकोर्टाने गुरुवारी जामिन मंजूर केला आहे. या खटल्यातील अन्य आरोपींना जामिन मिळालेला असल्याने त्याच न्यायाने वंजारांना जामिन देण्यात आला आहे. अर्थात, इशरत जहाँ बनावट चकमकीतही वंजारा आरोपी असल्याने ते लागलीच तुरुंगाबाहेर येणार नसून त्यांचा मुक्काम साबरमती तुरुंगात राहणार आहे. तरी, सोहराबुद्दिन बनावट चकमकीत जामिन ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.
सोहराबुद्दिन शेख त्याची पत्नी कौसरबी व तुलसीराम प्रजापती यांची हत्या झालेली चकमक बनावट होती आणि तिचे सूत्रसंचालन वंजारा यांनी केल्याचा आरोप आहे. पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलेले वंजारा गेली सात वर्षे तुरुंगात असून त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु अनेकवेळा तो फेटाळल्यानंतर आज मंजूर करण्यात आला आहे.
या खटल्यातील २३ आरोपींपैकी १७ आरोपींना यापूर्वीच जामिन मिळाला असून त्यामध्ये राजकुमार पांडियन, अभय चुडासामा, दिनेश एमएन आदी आयपीएस अधिका-यांचा समावेश आहे.