भारीच! गावात शेतीशिवाय कमाईची सुवर्णसंधी, 'या' योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार तब्बल 3.75 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:25 PM2021-03-17T15:25:06+5:302021-03-17T15:33:16+5:30
Soil Health Card Scheme : आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया...
नवी दिल्ली - तुम्हाला शेती क्षेत्रात आवड असून आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र शेती करायची नाही तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ व्यवसायच सुरू करू शकत नाही तर त्यातून चांगले पैसे देखील कमवू शकता. रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येणार आहे. तसेच ज्यांना काही तरी वेगळं करायचं आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. मोदी सरकारच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया...
काय आहे योजना?
केंद्र सरकारच्या या योजनेला सॉइल हेल्थ कार्ड स्कीम (Soil Health Card Scheme) असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर मिनी सॉइल टेस्टिंग लॅबची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर या लॅबच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. देशातील शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत सध्या प्रयोगशाळा फारच कमी आहेत. त्यामुळे त्यात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच देशाला अशा प्रयोगशाळांची खूप आवश्यकता आहे.
नेमकं काम काय?
शेतातील मातीची यामध्ये चाचणी केली जाते. मातीची तपासणी करुन त्यात आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात आणि तपासणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पानद वाढवण्यात खूप मदत होते. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. लागवडीच्या वेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवं हे माती तपासल्यानंतर समजतं. याचबरोबरच खतांविषयी बरीच माहिती मिळते.
कोण सुरू करू शकतं ही लॅब?
या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. यासह उमेदवाराला एग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण, द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात मॅट्रिक असणं आवश्यक आहे.
किती होतो खर्च?
साधारणपणे अशी कोणतीही लॅब स्थापित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा (Soil Health Card Scheme) फायदा घेतल्यास, त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. याचाच अर्थ सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला केवळ 1 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यातून तुम्ही चांगली कमाईदेखील करू शकता.
कुठे संपर्क करायचा?
लॅब सुरू करण्याची इच्छा असलेले तरुण, उमेदवार, शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू शकतात. यासाठी तुम्ही agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या वेबसाईटचा वापर करू शकता. किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते. सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. तसेच संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.