कोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 09:25 PM2022-09-29T21:25:16+5:302022-09-29T21:26:08+5:30
सरकारी नियमांमुळे एका महिलेला आपली स्कूटी विकता येत नसल्याची घटना घडली आहे. याउलट तब्बल 18 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले आहे.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नियमांमुळे एका महिलेला आपली स्कूटी विकता येत नसल्याची घटना घडली आहे. याउलट तब्बल 18 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले आहे. सोलन येथील महिलेचे पती रितू सूद यांचा दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली.
कुटुंबाची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नवर्याची आठवण असलेली स्कूटी विकण्याची वेळ आली आहे. मात्र ही स्कूटी विकण्यासाठी महिला सचिवालयात पोहोचताच त्यावर तब्बल 18 हजार रुपयांचा दंड असल्याची माहिती मिळाली. कारण नियमानुसार पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावावर वेळेत स्कूटी हस्तांतरित करण्यात आलेली नाही. खरं तर हा नियम 2022 मध्ये बनवला गेला आहे आणि 2020 मध्ये पतीचा मृत्यू झाला आहे,
या नियमासमोर सर्व अधिकारी देखील प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. या महिलेच्या मदतीसाठी शहरातील काँग्रेस अध्यक्ष पुढे आले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडली. मात्र असे असूनही काहीही झाले नाही. अंकुश सूद म्हणाले की, येथे आल्यानंतर त्यांना कळले की येथे अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यामुळे लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ज्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.
रितू सूद या महिलेने सांगितले की, पतीच्या निधनानंतर तिला घर चालवताना खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे ती तिच्या पतीची स्कूटी विकण्यासाठी आली होती, पण इथे तिच्या स्कूटीची निम्मी किंमत केवळ दंडातच जात आहे. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा दंड माफ करावा, अशी तिची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.