जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:02 PM2024-11-13T18:02:30+5:302024-11-13T18:03:05+5:30
एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला.
मनोज कुमार राय यांची प्रेरणादायी कथा त्या सर्व लोकांसाठी एक उदाहरण आहे जे कठीण परिस्थितीतही आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करतात. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथे दोन वेळचे जेवणही मिळणं कठीण होतं. लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला. या संघर्षानंतरही मनोज यांनी हार मानली नाही आणि आयएएस होण्याचं स्वप्न पाहिलं.
१९९६ मध्ये, मनोज आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी भाज्या विकल्या तसेच अनेक कार्यालयांमध्ये क्लिनर म्हणून काम केलं. एके दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामान पोहोचवत असताना त्यांना काही विद्यार्थी भेटले. या विद्यार्थ्यांनी मनोज यांना यूपीएससी परीक्षेबद्दल सांगितलं आणि त्याचवेळी मनोज यांनी ठरवलं की, त्यांनाही आयएएस होऊन आपल्या कुटुंबाची आणि गावाची गरिबी संपवायची आहे. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीच्या अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बीएचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही भाजीपाला विकत राहिले. २००० मध्ये त्यांनी बीएची पदवी पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी तीन वर्षे अहोरात्र मेहनत केली. प्रत्येक अयशस्वी प्रयत्नाने त्यांना अधिक मजबूत केलं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.
यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत तीन वेळा नापास होऊनही मनोज यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी त्यांनी आपली रणनीती सुधारली आणि पूर्ण प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवली. २०१० मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना ८७० वा रँक मिळाला आणि आयएएस होण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. अथक परिश्रम, संयम आणि जिद्द हेच त्यांच्या यशामागचं कारण होतं.