चंदू चव्हाण यांना सोडायची आहे लष्कराची नोकरी, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 12:26 PM2018-05-21T12:26:41+5:302018-05-21T12:26:41+5:30
चंदू चव्हाण सध्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
नवी दिल्ली- 18 महिन्यापूर्वी सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांना लष्कराची नोकरी सोडायची आहे. नोकरी सोडण्यासाठी त्यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं आहे. सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्यावर पाकिस्तानने चंदू चव्हाण यांना बंदी बनवलं व चार महिने कैदेत ठेवलं. चंदू चव्हाण सध्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. चंदू चव्हाण यांना आता लष्करातील नोकरी सोडायची असून त्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिल्याचं हिंदुस्तान टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
'मी गेल्या 20 दिवसांपासून मिलिट्री हॉस्पिटलच्या मानोसपचार विभागात आहे. मला नोकरीतून मुक्त करावं, यासाठी मी तीन दिवसांआधी वरिष्ठांना पत्र पाठवलं आहे. काही काळाआधी माझ्याबरोबर जे झालं, ते मला भारी पडलं आहे. लष्कराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर मला सामान्य जीवन जगायचं आहे', असं चंदू चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.
29 सप्टेंबर 2016 रोजी 24 वर्षीय जवान चंदू चव्हाण सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्याच दिवशी भारतीये सेनेने सर्जिकल स्टाइकही केला होता. पाकिस्तानात गेल्यावर चार महिन्यानंतर चंदू चव्हाणला भारतात परत पाठविण्यात आलं. भारतात परत आल्यावर चंदू चव्हाण न्यायालयीन चौकशीला सामोरं गेले. त्यांना वरिष्ठांच्या परवानगी शिवाय कॅम्प सोडून जाण्याची शिक्षाही दिली गेली. दरम्यान, तीन आठवड्याआधी चंदू चव्हाण यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चंदू चव्हाण यांच्या वागण्यातील काही समस्येमुळे त्यांना देखरेखेखाली ठेवणं गरजेचं होतं. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.