जवानांच्या रेशनची बाजारात विक्री
By admin | Published: January 12, 2017 01:09 AM2017-01-12T01:09:34+5:302017-01-12T01:09:34+5:30
सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी जवानांचे रेशन कमी दराने स्थानिक बाजारपेठेत विकतात, असा दावा स्थानिक लोकांनी केला.
श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी जवानांचे रेशन कमी दराने स्थानिक बाजारपेठेत विकतात, असा दावा
स्थानिक लोकांनी केला.
बीएसएफचा जवान तेजबहादूर याने पोस्ट केलेल्या जवानांच्या निकृष्ट अन्नाच्या व्हिडिओमुळे देशभर खळबळ उडालेली असताना हा प्रकार समोर आला.
निमलष्करी दलांच्या विशेषत: बीएसएफच्या छावणीजवळ राहणाऱ्या लोकांना अधिकारी बाजारमूल्याच्या निम्म्या दराने रेशन व इंधन विकतात, असे वृत्त इंग्रजी दैनिकाने स्थानिकांच्या हवाल्याने दिले आहे. बीएसएफ जवान तेजबहादूर यादवने आपल्या व्हिडिओत याचा उल्लेख केला होता.
सरकार आमच्यासाठी पुरेशे रेशन पाठवते; परंतु अधिकारी त्याची परस्पर विक्री करतात, असे तेजबहादूरने म्हटले होते. त्याच्या या आरोपाची आसपास राहणाऱ्या लोकांनी पुष्टी केली आहे.
विमानतळाजवळ बीएसएफचे मुख्यालय आहे. तेथील अधिकारी आसपासच्या दुकानदारांना कमी दरात रेशन आणि इंधन विकतात, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. ओळख उघड न करण्याच्या अटीवर एका बीएसएफ जवानानेच सांगितले की, अधिकारी स्थानिक बाजारांत डाळ आणि भाज्या या वस्तू बाजारभावाहून कमी दरात विकतात. आम्हाला अनेकदा दैनंदिन वापराच्या वस्तूही मिळत नाहीत. अधिकारी दलालाच्या माध्यमातून त्यांची बाजारपेठेत विक्री करतात. हुमहमा छावणीतील काही अधिकाऱ्यांकडून निम्म्या दरात डिझेल, पेट्रोल मिळते. तांदूळ, मसाले आणि डाळ यासारख्या वस्तूही अत्यंत कमी दरात मिळतात, असे एका बांधकाम ठेकेदाराने सांगितले. (वृत्तसंस्था)