LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार
By बाळकृष्ण परब | Published: October 6, 2020 10:39 PM2020-10-06T22:39:17+5:302020-10-06T22:44:13+5:30
Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.
नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने आपले लष्कर उभे केले आहे. दरम्यान आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.
अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे.
भारताने फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत या रायफल्स खरेदी केल्या होत्या. नव्या रायफल्सना सध्याच्या भारतीय स्मॉल आर्म्स सिस्टिम रायफलमधून बदलण्यात येईल. या रायफल्सचा वापर सध्या भारतीय सुरक्षा बलांकडून करण्यात येत आहे.
आखलेल्या योजनेनुसार सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी अभियानांसाठी आणि एलओसीवर तैनात जवान आयात करण्यात आलेल्या सुमारे दीड लाख रायफल्सचा वापर करणार आहेत. तर इतर सुरक्षा दलांना एके-२०३ रायफल्स देण्यात येतील. या रायफल्सची निर्मिती रशिया आणि भारत यांनी अमेठी येथे संयुक्तपणे उभारलेल्या अमेठी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाने लाइट मशीन गनची मागणी पूर्ण करण्यासाठी इस्राइलला १६ हजार एलएमजीची ऑर्डर दिली आहे.
भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या पाच महिन्यांपासून तणाव आहे. भारताने चीनच्या सीमेवरील आक्रमणाला अत्यंत आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले आहे. विशेषकरून गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्यानंतर भारताकडून अधिकच आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.