जवानांवर हल्ल्याचा कट उधळला, दोन पाकिस्तानी BAT कमांडो ठार
By admin | Published: May 26, 2017 03:26 PM2017-05-26T15:26:13+5:302017-05-26T15:48:34+5:30
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडोचा हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 26 - सीमेवर सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. नियंत्रण रेषेवर उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा घात लावून हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. सर्तक असलेल्या भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन बॅट कमांडो ठार झाले.
मे महिन्याच्या सुरुवातील अशाच प्रकारे गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर बॅट कमांडोंनी घात लावून हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता. यापूर्वी याच कमांडोंनी नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांना मारल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली आहे.
भारतीय सैन्याने मंगळवारी दुपारी नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरु आहे. पाकिस्तानातील जनतेसमोर तिथल्या लष्कराची नाचक्की झाल्याने पाकिस्तानकडून अशी कुठली तरी कृती अपेक्षितच होती. पण यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानचा डाव त्यांच्यावर उलटवला.
पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले होते. त्यावेळीच अशा प्रकारच्या हल्ल्याची कुणकुण लागली होती. "टाइम्स नाउ" या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीममध्ये केवळ सैन्यचं नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे.
कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित मिळाल्यामुळे पाकिस्तानचा आधीच तिळपापड झाला आहे. त्यात भारतीय लष्करासमोर हार होत असल्याने पाकिस्तानात सर्वच स्तरावर मोठया प्रमाणावर अस्थिरता आहे. पाकिस्तानी वायू दलाच्या विमानांनी बुधवारी सियाचीनमध्ये भारतीय सीमेजवळून उड्डाण करुन कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तसेच आपणही भारतीय चौक्या कशा नष्ट केल्या त्याचा बनावट व्हिडीओ जारी केला.
नियंत्रण रेषेजवळ संयुक्त राष्ट्रांच्या वाहनावर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रांनीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे खोटेपणा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने पत्रकारपरिषद घेऊन भारतीय सैन्याने गोळीबार केल्याच्या बातमीचे खंडन केले. प्रत्यक्षात असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. भीमबेर जिल्ह्यात संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची वाहनेसुद्धा सोबत होती. यावेळी परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. खास संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना लक्ष्य करण्याच्या हेतूने हा गोळीबार झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले.
J&K: Attack by Pakistan"s Border Action Team on Indian Army patrol along the LoC in Uri sector foiled. 2 BAT attackers killed. Ops on pic.twitter.com/fAlyuG3Q52
— ANI (@ANI_news) May 26, 2017