जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 08:56 AM2023-03-24T08:56:02+5:302023-03-24T09:01:42+5:30
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल.
नवी दिल्ली : देशातील लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल ५० वर्षांनंतर पारंपरिक भरडधान्याची चव चाखता येणार आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने पुढाकार घेत लष्कराने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या आहारात भरडधान्याच्या पिठाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी, गव्हाच्या पिठाला प्रोत्साहन देण्यासाठी सैन्याच्या रसदमध्ये भरड धान्य पिठाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. पुढील आर्थिक वर्षापासून सैनिकांना दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये तांदूळ आणि गव्हाच्या पिठात २५ टक्क्यांपर्यंत भरडधान्याचे पीठ समाविष्ट करण्यासाठी लष्कराने केंद्र सरकारकडे खरेदीची परवानगी मागितली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल. भरड धान्यापासून तयार पीठ म्हणजे बाजरी, ज्वारी आणि नाचणीचे पीठ सैनिकांना उपलब्ध करून दिले जाईल.