धुन धुन पळून आलेला कमलेश आता शाळेत जात असल्याची बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:59 PM2017-12-01T12:59:53+5:302017-12-01T14:52:53+5:30
सोल्युशन या ड्रगला अॅडीक्ट झालेला कमलेश अाता शाळेत जातोय आणि त्या व्यसनातून बाहेर आल्याचा व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.
दिल्ली : तुम्हाला तो भोपालचा कमलेश आठवतोय? सोल्यूशन ड्रगमध्ये अडकलेला. मध्यंतरी त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. विद्यार्थी कशाप्रकारे व्यसनांच्या आहारी जाताएत याचं ते उत्तम उदाहरण होतं. या कमलेशने सोल्यूशन या ड्रगविषयी, त्याच्या घरच्यांविषयी सांगितलेली माहिती काळीज पिळवटून टाकणारी होती. आपल्या आईपेक्षाही हे ड्रग्सचं सेवन किती महत्त्वाचं आहे असं त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं होतं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षात जगातील सगळी व्यसनं या चिमुरड्याला लागल्याने अनेक पालकही चिंतेत पडले होते. पण याच विषयावरून आता सोशल मीडियावर पुन्हा खळबळ माजली आहे.
आई वडिलांना सोडून दिल्लीत राहायला आलेला कमलेश मोलमजुरी करून दिवसाला १०० ते १५० रुपये कमवतो. त्यातले २० रुपये जेवायला तर ९० रुपये सोल्यूशन हे ड्रग घ्यायला खर्च करतो. त्याला आता आईकडे परत जायचं नाहीए. सोल्यूशन हेच त्याचं जग आहे. त्याच्या डोळ्यात कसलीच स्वप्नही नाहीएत. दिवसभर काम करून रात्री सोल्यूशनचं सेवन करायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं असा त्याचा दिनक्रम होता. हे सारं मध्यंतरी व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आलं. या कमलेशची नेटीझन्सने खिल्लीही उडवली तर काहींनी या मुलाच्या आणि एकंदरीतच व्यसनी गेलेल्या सगळ्याच मुलांच्या भविष्याविषयी चिंताही व्यक्त केली. ‘नशेबाज- द डाईंग पीपल ऑफ दिल्ली’ ही धीरज शर्मा यांची मुळ डॉक्यूमेंट्री. या डॉक्यूमेंटरीमध्ये कमलेशच्या व्हिडिओचाही समावेश आहे. कोणीतरी नेमका तोच व्हिडिओ कट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
मात्र आता या व्हिडिओचा दुसरा चेहरा फेसबुकच्या काही पेजने समोर आणलाय. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमलेश सहावीत शिकतोय आणि त्याला आता कसलंच व्यसन नसल्याचं तो सांगतोय. अनेक फेसबुक पेजने हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर नेटीझन्सने या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला. कमलेश खरंच सुधारला असेल तर त्याचं कौतुकच आहे असं नेटीझन्सने म्हटलं आहे. पण कित्येक नेटीझन्सचा या व्हिडिओवर अजिबात विश्वास बसत नाहीए. कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा हा दिल्लीतल्या कमलेशसारखा अजिबात दिसत नसल्याचं सांगण्यात येतंय.
तसंच कमलेशचा मुळ व्हिडिओ ज्याने तयार केला त्या धीरज शर्माने या दुसऱ्या व्हिडिओत कमलेश नसल्याचं म्हटलं आहे. कोणीतरी व्ह्यूज मिळावेत याकरता मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला आहे. दोन्ही व्हिडिओमध्ये असणाऱ्या मुलांमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे कोणीही उगाच या हा दुसरा व्हिडिओ पसवरून समाजात खोटी माहिती पसरवू नये असे आवाहन केले आहे. तसंच हा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वी रेकॉर्ड झाला होता. त्यावेळेस कमलेश १३ वर्षांचा होता. त्यामुळे तो आता जवळपास १८ वर्षांचा असेल. त्यामुळे दुसऱ्या व्हिडिओत दाखवण्यात आला हा मुलगा कमलेश नसून कोणीतरी चुकीची माहिती पसरवत असल्याचं धीरज शर्मा यांनी सांगितलं आहे.
सौजन्य - www.scoopwhoop.com आणि www.beingindian.com