निवृत्त होताना समाधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:01 AM2017-07-24T01:01:41+5:302017-07-24T01:01:41+5:30

भारताची राज्यघटना हे केवळ प्रशासन व्यवस्थेचे कायद्याचे पुस्तक नाही. १०० कोटींहून अधिक भारतीय नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे.

The solution to retire! | निवृत्त होताना समाधान!

निवृत्त होताना समाधान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताची राज्यघटना हे केवळ प्रशासन व्यवस्थेचे कायद्याचे पुस्तक नाही. १०० कोटींहून अधिक भारतीय नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे. राष्ट्रपती या नात्याने आपण या राज्यघटनेचे फक्त वाक्यार्थाने नव्हे तर भावार्थानेही रक्षण आणि जतन करण्याचा मनापासून प्रयत्न केला. देशवासियांचा विनम्र सेवक म्हणून हे करण्याचे भाग्य मिळाले या समाधानाच्या आणि कृतार्थ भावनेने मी निवृत्त होत आहे, अशा भावपूर्ण शब्दांत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी संसदेचा निरोप घेतला.
सहा दशके अनेक जबाबदाऱ्या सांभाळत सार्वजनिक जीवनात सर्वांच्याच आदराचा आणि कौतुकाचा विषय ठरलेल्या प्रवदांना राष्ट्रपतीपदावरून पायउतार होण्यास दोन दिवस राहिलेले असताना संसदेने एका हृद्य सोहळ््यात या मावळत्या राष्ट्रप्रमुखाला औपचारिक निरोप दिला. राष्ट्रपती या नात्याने संसदेत शेवटचे भाषण करताना मुखर्जी भावनाविवश झाले व अनेक जुन्या स्मृती त्याच्या मनात उचंबळून आल्या. त्यांचे भाषण म्हणजे वडिलधाऱ्याने दिलेला अनुभवाचा सल्ला होता.
संसदेने जीएसटीला एकमताने दिलेली मंजुरी हे लोकशाहीच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे, असे सांगून मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केली. मात्र या समाधानाला थोडीशी खेदाची झालर लावत त्यांनी विधेयकांवर साधकबाधक चर्चा करून मंजुरी देण्यासाठी संसदेत कमी वेळ दिला जात असल्याबद्दल त्यांच्या शब्दांतून नाराजी जाणवली. माझ्या राजकीय विचारांना आणि सार्वजनिक आचरणाला याच संसदेने घडविले. याच संसदेतून मी तयार झालो असे म्हणजे औधत्याचे होणार नाही, असेही मुखर्जी यांनी नमूद केले. थोडीशी खंत आणि असंख्य स्मृतींचे इंद्रधनुष्य मानत घेऊन मी आज या लोकशाहीच्या भव्य मंदिराची रजा घेत आहे, असे ते म्हणाले. सुरुवातीस लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी यांनी सर्व सदस्यांच्या वतीने मावळत्या राष्ट्रपतींविषयी आदरभाव व्यक्त केला. मुखर्जी यांनी प्रगल्भ कतृत्वाने राष्ट्रपतीपदाची उंची आणखी वाढविली, असे अन्सारी म्हणाले. ज्यांच्यामुळे भारतीय संसद जिवंत आणि समद्ध झाली अशा अनेक थोर पूर्वसुरींच्या सहवासाचे व त्यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले याबद्दल मुखर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी पिलू मोदी, हिरेन मुखर्जी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी आणि लालकृष्ण आडवाणी यांचा नामोल्लेख केला. स्वत:ला सुधारणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मी इंदिराजींकडून शिकलो. नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्यामुळे माझे संसदीय जीवन समृद्ध झाले तर आडवाणींनी मला प्रगल्भ सल्ला दिला, असे त्यांनी सांगितले.

इंदिराजी उत्तुंग मार्गदर्शक

उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या इंदिराजी या आपल्या राजकीय कारकिर्दीच्या मार्गदर्शक होत्या, असे आदराने नमूद करून प्रणवदा म्हणाले की, सत्य किती कटु असले तरी ते स्पष्टपणे मांडण्याचा धारिष्ट्य त्यांच्याकडे होते. या संदर्भात त्यांनी एक किस्सा सांगितला. आणिबाणीनंतरच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर
१९७८ मध्येत्या लंडनला गेल्या.

पत्रकारांनी आक्रमकतेने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पहिला प्रश्न होता, ‘आणिबाणी लादून तुम्ही काय मिळवलंत?’. प्रश्नकर्त्याच्या थेट डोळ््यात पाहात इंदिराजी उत्तरल्या, ‘त्या २१ महिन्यांत समाजाच्या सर्व वर्गांपासून दूर जाण्यात आम्हाला यश आले’. त्यानंतर एकानेही आणिबाणीबद्दल पुढचा प्रश्न विचारला नाही.

Web Title: The solution to retire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.