सोमय्यांनी लाटला ‘एसआरए’ प्रकल्प
By admin | Published: May 16, 2016 04:49 AM2016-05-16T04:49:34+5:302016-05-16T04:50:17+5:30
सत्तेच्या गैरवापराचा आरोप करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या हे स्वत:च भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून, झोपडपट्टीवासीयांचा प्रकल्प लाटत असल्याची गंभीर बाब समोर आली
मुंबई : राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराचा आरोप करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या हे स्वत:च भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून, झोपडपट्टीवासीयांचा प्रकल्प लाटत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सोमय्या यांनी आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स’च्या माध्यमातून सांताक्रुझ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) लाटला असून, स्थानिक रहिवाशांवर बेघर होण्याची पाळी आली आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केला.
सांताक्रुझमधील कलिना येथील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पातील अनियमितता आणि त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना होणाऱ्या त्रासाबाबत कल्पना इनामदार यांनी सांगितले की, ‘किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स’ने कलिना येथील हा एसआरए प्रकल्प खिशात घातला आहे. त्यासाठी मृत व्यक्तीच्या नावे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने हा प्रकल्प रेटण्यात येत असून, त्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. १३ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प सुरुवातीस जेमिनी बिल्डरमार्फत राबविण्यात येत होता. त्यानंतर, तो डॉमिनंड डेव्हलपर्सकडे आला. मात्र, सोमय्यांच्या ‘मेधा डेव्हलपर्स’ने डॉमिनंड डेव्हलपर्सशी हातमिळवणी करत, १५ कोटी रुपयांत हा प्रकल्प पदरात पाडून घेतला. त्यास झोपडपट्टीवासीयांची संमती नव्हती. दरम्यानच्या काळात, जमिनीचे मालक रमेश मल्होत्रा यांचे निधन झाले. त्यानंतर, सोमय्या यांनी मयत विकासकाचे प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत, न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती त्यात दिली, असेही इनामदार यांचे म्हणणे आहे. उपजिल्हाधिकारी संदीप कळंबे यांनी सोमय्या यांच्या आदेशावरूनच झोपडपट्टीवासीयांवर कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. कारण या आधीचे अप्पर जिल्हाधिकारी हिरालाल सोनवणे यांच्याकडे झोपडपट्टीवासीयांनी अपील केले होते. त्यावेळी सोनवणे यांनी विकासकाकडे इंटीमेशन आॅफ अॅप्रूव्हल नसल्याचे कारण देत, झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र, या निकालावर सोमय्या यांनी विकासक मयत असल्याने, त्यांचे प्रतिनिधी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाची दिशाभूल करून निकाल पदरात पाडून घेतल्याचा दावा इनामदार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
अधिकारी हाताशी
या प्रकल्पाच्या पुनर्विकास बांधकाम परवानगीची मुदत संपली असतानाही, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांनी विकासकांच्या बाजूने निकाल दिला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोमय्या यांनी प्रकल्प रेटला आहे. सोमय्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे स्थानिक झोपडपट्टीवासीयांवर सोमवार, १६ मे रोजी निष्कासनाची कारवाई होणार असल्याचा आरोप इनामदार यांनी केला.
२३३ पैकी केवळ
१७३ झोपड्या पात्र
या प्रकल्पात एकूण २३३ झोपड्या असतानाही केवळ १७३ झोपड्यांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यातील १० झोपडपट्टीवासीयांवर सोमवारी निष्कासनाची कारवाई करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे.
त्यामुळे स्थानिक झोपडीवासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.