काही लेखक पुरस्कार परत घेण्यास राजी
By admin | Published: January 23, 2016 03:33 AM2016-01-23T03:33:33+5:302016-01-23T03:33:33+5:30
देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य
नवी दिल्ली : देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य काही लेखक आपले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्यास तयार झाले आहेत.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. साहित्य अकादमीने लेखकांना त्यांचे पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची व सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना आधीच त्यांचा पुरस्कार परत केला आहे. एक अन्य लेखक नंद भारद्वाज हेही आपला पुरस्कार परत स्वीकारण्यास राजी झाले आहे. अन्य लेखकांनाही त्यांचे पुरस्कार परत केले जातील, असे तिवारी यांनी सांगितले.
लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीची चुप्पी तसेच दादरी कांडानंतर देशात कथित असहिष्णुता वाढल्याच्या निषेधार्थ सुमारे ४० लेखकांनी मोदी सरकार व साहित्य अकादमीच्या विरोधात आपले पुरस्कार परत केले होते. या ‘पुरस्कार वापसी’ने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीने गत २३ आॅक्टोबरला सर्वसहमतीने सरकारविरोधी निषेधाचा ठराव पारित करून राज्य व केंद्र सरकारांना अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले होते. शिवाय लेखकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा ग्रहण करण्याची विनंती केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)