भाजपाच्या काही नेत्यांनी तोंडं बंद ठेवण्याची गरज- नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:21 AM2018-12-20T08:21:59+5:302018-12-20T08:22:27+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात बोलत होते. भाजपाच्या नेत्यांनी मीडियाला सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे. राफेल प्रकरणावर भाजपाकडून घेण्यात आलेल्या 70 पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.
यावेळी गडकरींनी 1972मधल्या हिंदी चित्रपट बाँबे टू गोवामधील एका दृश्याचा उल्लेख केला आहे. ज्यात आई-वडील मुलांना खाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा घालतात. आमच्या पक्षातील काही लोकांना अशाच प्रकारच्या कापडाच्या गोळ्याची गरज आहे. गप्प राहण्याचा आदेश हा हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र काढणाऱ्यांसाठी आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते सर्व मस्करीत बोलल्याचं सांगत बाजू मारून नेली.
गडकरी म्हणाले, मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)च्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. जेपीसी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.