काही जणांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू- नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 09:04 AM2018-09-10T09:04:05+5:302018-09-10T10:54:46+5:30
शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन
शिकागो: सध्या काहीजणांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते अमेरिकेतील शिकागोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित करत होते. हिंदू धर्मातील खऱ्या मूल्यांच्या संरक्षणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारताचा सार्वभौम सहनशीलतेवर विश्वास असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी म्हटलं. सर्व गोष्टी एकमेकांशी वाटून घेणं आणि एकमेकांची काळजी घेणं ही हिंदू धर्माची मूळ तत्त्वं असल्याचं ते म्हणाले. सध्या हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'सध्या काही लोकांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी त्यांचे विचार योग्यपणे मांडायला हवेत. त्यामुळे प्रामाणिक दृष्टीकोन जगासमोर येईल,' असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं.
व्यंकय्या नायडू यांच्या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित केलं. हिंदू कोणालाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत. मात्र हिंदूंना विरोध करणारे काही लोक असू शकतात, असं भागवत यांनी म्हटलं होतं. हिंदू समुदायानं एकजूट होऊन मानवाच्या कल्याणासाठी काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं.