IIT कडून डिग्री घेऊनही काही लोक अडाणी राहतात, नायब राज्यपालांची केजरीवालांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 04:49 PM2023-04-09T16:49:16+5:302023-04-09T16:50:54+5:30
Delhi Politics: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून आता नायब राज्यपालांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरून शाब्दिक चकमकी होत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून आता नायब राज्यपालांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, कधी कुणी आपल्या पदवीचा अहंकार बाळगता कामा नये. कारण पदव्या ह्या शिक्षणाला झालेल्या खर्चाच्या पावत्या असतात. शिक्षण तेच आहे जे तुमचं ज्ञान आणि तुमच्या व्यवहाराला दर्शवते. ही बाब सिद्ध झाली आहे की, काही लोक आयआयटीकडून पदवी घेतल्यानंतरही अडाणी राहतात.
दिल्लीचे नायब राज्यपाल रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, आम आदमी पक्ष पंतप्रधानांच्या पदवीवरून सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. त्यावर नायब राज्यापालांनी सांगितले की, त्यांच्या कानावरही अशा बातम्या येत आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांचं नाव न घेता नायब राज्यपाल म्हणाले की, त्यांनी विधानसभेत अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. मात्र कुणीही आपल्या पदवीवर एवढा अहंकार बाळगता कामा नये.