काही शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 10:56 AM2024-11-01T10:56:50+5:302024-11-01T11:08:56+5:30
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.
एकतानगर : देश व विदेशातील काही शक्ती या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा, तसेच साऱ्या जगात देशाची प्रतिमा नकारात्मक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना उघडे पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनतेला केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.
याप्रसंगी मोदी म्हणाले की, भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देश व विदेशातील काही शक्ती आपल्या देशाच्या आर्थिक हिताला बाधा आणू इच्छितात. जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे काही लोक लष्करावर टीका करतात, तसेच लष्करामध्ये फुटीरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. (वृत्तसंस्था)
‘काही जणांचे दुही माजविण्याचे काम’
नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही लोक नेहमी लोकशाही, राज्यघटनेबद्दल बोलत असतात व प्रत्यक्षात ते देशात दुही माजविण्याचे काम करतात. या शहरी नक्षलवाद्यांची कारस्थाने जनतेने वेळीच ओळखावीत. नक्षलवाद संपवत आणला आहे. आता शहरी नक्षलवाद डोके वर काढत आहे. त्यांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील नक्षलवादी चळवळ आता अखेरचा श्वास घेत आहे. पटेल यांची १५०वी जयंती देश दोन वर्षे साजरी करणार आहे, असेही माेदी म्हणाले.
‘योजनांमध्ये ऐक्याचा विचार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या केंद्र सरकारने अमलात आणलेल्या योजनेमध्ये देशातील ऐक्याचा प्राधान्याने विचार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आवास योजना, जीएसटी आदी योजनांचा उल्लेख केला. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात अडथळे ठरणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेला स्मरून आपल्या पदाची शपथ घेतली. ही मोठी घटना आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.