कुणी म्हणतंय संकटमोचक, कुणी देवदूत; यूपी पोलिसांची इमेजच बदलली ना भौ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:26 PM2020-04-21T16:26:18+5:302020-04-21T16:30:06+5:30
नोएडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले.
नोएडा - उत्तर प्रदेशपोलिसांची प्रतिमा नेहमीच नकारात्मक मानली जात आहे, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाउननंतर बदललेल्या परिस्थितीत पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीने आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यानंतर त्यांना देवदूत मानले जात आहे. वास्तविक, गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान, यूपी पोलिसांनी लोकांना सर्वतोपरी मदत केली. अशा परिस्थितीत मदत मिळवणारे लोक यूपी पोलिसांना अगदी संकटमोचक आणि देवदूत म्हणण्यापासून मागेपुढे पाहत नाहीत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडाचे ताजे प्रकरण आहे. सेक्टर २४ मध्ये असलेल्या ईएसआय रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीदरम्यान रक्त आवश्यक होते, तेव्हा नोएडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजुलकुमार त्यागी आणि लाला राम या दोन पोलिसांना महिलेच्या रक्ताची गरज असल्याची माहिती मिळाली तेव्हा दोघांनीही थोडाही विलंब न करता रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रुग्णालयात जाऊन 2 युनिट रक्त दिले, ज्यामुळे त्या महिलेची यशस्वी प्रसूती झाली आणि तिने निरोगी बाळाला जन्म दिला. आता आई व मुल दोघेही सुखरूप आहेत आणि ती महिला रक्तदान करणार्या दोन पोलिस अंजुल व लाल राम यांचे आभार मानत आहे.
संकटकाळात नोएडा पोलीस लोकांसोबत
या संपूर्ण प्रकरणावर एसीपी रजनीश वर्मा यांचे म्हणणे आहे की, माहिती मिळताच पीआरवी महिलेच्या मदतीसाठी पोहोचले आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनो एक - एक युनिट रक्त देऊन मदत केली. या संकटकाळात पोलीस अनेक प्रकारे मदत करण्यास तयार आहेत. लोकांना ज्या प्रकारची मदत हवी आहे, तशी पोलीस त्या प्रकारची मदत देत आहेत.
असे आहे संपूर्ण प्रकरण
कॉलर विजय कुमारच्या मते, त्याच्या पत्नीची प्रसूती सुखरूप झाली आहे. तिला ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्रथम रक्ताची गरज भासली आणि त्यानंतर त्यांनी लोकांची मदत घेतली. लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने कोणीही रक्तदान करण्यास पुढे आले नाही, त्यानंतर हेल्पलाईन नंबर 112 वर कॉल केला. यानंतर पोलीस अंजुलकुमार त्यागी आणि लाला राम यांनी सेक्टर २४ मधील ईएसआय रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.
४०० किलोमीटरवर जाऊन पोलिसांनी कॅन्सरग्रस्तास दिले औषध
गेल्या आठवड्यात डायल -112 वर शुक्रवारी एकाने ट्विटरद्वारे मदतीसाठी विचारणा केली. त्या ट्विटमध्ये असे म्हटले होते की, कन्नौजमधील कॅन्सरच्या रुग्णांचे औषध संपले आहे. यानंतर, यूपी पोलीस मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी 400 किमी दूर लखनौहून औषध मागितले आणि कॅन्सर रूग्णांपर्यंत पोहोचवले. कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या मुलीला कन्नौजमध्ये औषध मिळू शकले नाही. लॉकडाउनमध्ये लखनौसारख्या मोठ्या शहरात औषधासाठी येणे शक्य नव्हते. यावर औषध पाठविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली आणि कॅन्सरग्रस्तास वेळीच औषधं मिळाली.