काेणी अचानक किंचाळतो, कोणी हसतो! रेल्वे अपघातातग्रस्तांना बसला जबर धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 02:32 PM2023-06-13T14:32:31+5:302023-06-13T14:32:58+5:30
ओडिशा रेल्वे अपघातातील ४० जखमींना बसला जबर धक्का
बालासोर: ओडिशातील तिहेरी रेल्वेअपघातातील जखमी प्रवाशांपैकी काहींना मोठा धक्का बसला आहे. यातील कोणी झोपेतून दचकून उठतो. कोणी उगीचच किंचाळू लागतो. काही हसू लागतात, तर काही हमसून हमसून रडतात. काहींची तर झोपच गायब आहे.
या प्रवाशांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे हे दृश्य आता नित्याचे झाले आहे. हे लोक ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने’ (पीटीएसडी) पीडित आहेत. मोठा धक्का बसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
समुपदेशनासाठी ४ पथके
अशा जखमींचे समुपदेशन करण्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ याशिवाय एक सामाजिक कार्यकर्ता आणि जखमींच्या एक किंवा दोन नातेवाइकांचा समावेश असतो. हे पथक जखमींच्या मनातील दहशत दूर करण्याचा प्रयत्न करते.
फेरफारवर तपास केंद्रित
सीबीआयने स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीत करण्यात आलेल्या फेरफारवर तपास केंद्रित केला आहे. ही यंत्रणा कोणत्याही रेल्वेचा मार्ग ठरवते. कोरोमंडल एक्स्प्रेस मॅन्युअली सिग्नलला बायपास करून लूप लाइनवर पाठविल्याचा संशय आहे.
क्लिनिकल सायकॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. यशवंत महापात्रा यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. ते घाबरले आहेत. अपघातांतून वाचलेल्यांच्या मनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यांना त्यांच्या नैसर्गिक स्थितीत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.