कुछ तो गडबड है.... तेजस्वी यादव यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गणिताचा क्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 01:41 PM2018-04-11T13:41:29+5:302018-04-11T13:47:34+5:30
आकडेवारीचा आधार घेऊन मोदींच्या दाव्याची खिल्ली
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याचा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे. बिहारच्या दौऱ्यावर असताना मोदींनी राज्य सरकारने उभारलेल्या शौचालयांच्या संख्येचा उल्लेख केला होता. बिहार सरकारनं आठवड्याभरात ८.५ लाख शौचालयं बांधल्याचं मोदींनी काल (मंगळवारी) म्हटलं होतं. तेजस्वी यादव यांनी यावरुन मोदींचा गणिताचा क्लास घेतला आहे.
बिहार सरकारने आठवड्याभरात ८.५ लाख शौचालयं बांधली, असं मोदींनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं. मोदींच्या या दाव्याची तेजस्वी यादव यांनी गणिताचा आधार घेऊन खिल्ली उडवली. राज्य सरकारनं दर मिनिटाला ८४ शौचालयं बांधली असतील, तरच मोदींनी दिलेला आकडा खरा समजता येईल, असं तेजस्वी यादव यांनी आकडेमोड करुन ट्विटरवर म्हटलं आहे. मोदींचा दावा फसवा असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीदेखील मोदींच्या दाव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालयांची बांधणी करणं अशक्य असल्याचं निरुपम म्हणाले.
PM claimed 8.50 Lacs toilets made just in a week in Bihar.
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) April 10, 2018
1 week= 7 Days
1 Day= 24 Hrs
7 Days= 168 Hrs
1 Hour= 60 Mins
So
850000%168=5059 Toilets per Hr
5059/60 = 84.31 Toilets per min
Such a big goof-up from PM Sahab. I believe even CM Bihar won’t agree on such false claims
महात्मा गांधी यांनी बिहारच्या चंपारण्यात सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहाच्या स्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. या अभियानासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं. 'गेल्या आठवड्याभरात बिहारमध्ये ८ लाख ५० हजार शौचालयं बांधण्यात आली. हे एक मोठं यश आहे. यासाठी मी जनतेचं आणि सरकारचं अभिनंदन करतो,' असं मोदींनी म्हटलं होतं.