सोमनाथ भारतींना दोन वर्षांची शिक्षा; अपिलात न्याय मिळण्याची ‘आप’ला आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 02:16 AM2021-01-24T02:16:57+5:302021-01-24T02:17:15+5:30
९ सप्टेंबर २०१६ रोजी भारती यांनी सुमारे ३०० लोकांसह येथील एम्सच्या कुंपणाची भिंत जेसीबी मशीनच्या साह्याने पाडली होती.
नवी दिल्ली : भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सुरक्षा कर्मचाऱ्यांवर २०१६ मध्ये हल्ला केल्याच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे आ. सोमनाथ भारती यांना दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालानंतर आपने म्हटले आहे की, सोमनाथ यांच्यावर अन्याय झालेला असून, आता ते एक अपील दाखल करणार आहेत. तेव्हा तरी आता त्यांना न्याय मिळेल, अशी आशा वाटते आहे.
९ सप्टेंबर २०१६ रोजी भारती यांनी सुमारे ३०० लोकांसह येथील एम्सच्या कुंपणाची भिंत जेसीबी मशीनच्या साह्याने पाडली होती. न्यायालयाने भारती यांना भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार दोषी ठरविले. यात हल्ला करणे, लोकसेवकांना कर्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी ताकदीचा वापर करणे, दंगल करणे आदी आरोपांचा समावेश आहे. या आरोपांवर भारती यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच इतर साक्षीदारांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यासाठी साक्ष दिली होती. न्यायालयाने दिल्लीचे माजी कायदामंत्री असलेले भारती यांना त्यांच्या शिक्षेच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी जामीन दिला आहे.
दरम्यान, आपने म्हटले आहे की, आम्ही न्यायपालिकेचा सन्मान करतो. आम्हाला न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास आहे. तथापि, सोमनाथ यांच्यावर अन्याय झाल्याची आमची भावना आहे. सोमनाथ हे लोकप्रिय नेते आहेत व त्यांच्या मतदारसंघातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ते त्यांच्या लोकांसाठी २४ तास काम करतात.
‘चुकीच्या पध्दतीने गाेवले’
आरोपांवर भारती यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच इतर साक्षीदारांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यासाठी साक्ष दिली होती. न्यायालयाने दिल्लीचे माजी कायदामंत्री असलेले भारती यांना त्यांच्या शिक्षेच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी जामीन दिला आहे.