Somnath Chatterjee Death Updates: तत्वासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:39 PM2018-08-13T12:39:37+5:302018-08-13T12:41:52+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बाजू सलग 40 वर्षे लोकसभेत लावून धरणाऱ्या चॅटर्जी यांना आयुष्याची अखेरची 10 वर्षे राजकीय विजनवासात काढावी लागली.
मुंबई- लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे कोलकाता येथे निधन झाले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बाजू सलग 40 वर्षे लोकसभेत लावून धरणाऱ्या चॅटर्जी यांना आयुष्याची अखेरची 10 वर्षे राजकीय विजनवासात काढावी लागली. लोकसभेच्या सभापतीपदी बसल्यानंतर त्यांनी पक्षापेक्षा सभापतीपदाचे महत्त्व शिरोधार्य मानले. त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली. चार दशके ज्या पक्षासाठी काम केले त्याच पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि एकप्रकारच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले.
सोमनाथ यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी निर्मलचंद्र चॅटर्जी आणि वीणापाणी देवी यांच्यापोटी आसाममध्ये तेजपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता व इंग्लंडमध्ये झाले. इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण झाल्यावर त्यांनी हायकोर्टात वकिली सुरू केली. सोमनाथ चॅटर्जी यांनी 1968 साली माकपासाठी काम सुरु केले. 1971 च्या निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगाल राज्यातून लोकसभेत प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी 10 निवडणुका जिंकल्या. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या निकटवर्तियांपैकी ते एक होते.
#Somnath Da (Chatterjee) was a big brother to me. Our ideology was different but still, from the time I entered Parliament in '89, I used to see how he used to raise issues while following every rule. His tenure as a speaker was a guidance for me #LokSabha Speaker #SumitraMahajanpic.twitter.com/ptQKq2XTW5
— Primetime Khabar (@PrimetimeKhabar) August 13, 2018
2004 साली डाव्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे पहिले सरकार स्थापन करण्यात आले. मात्र भारत आणि अमेरिका यांच्यामधिल अणूकरराराला विरोध करणाऱ्या डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा जुलै 2008मध्ये काढून घेतला. 21 जुलै पासून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते मात्र त्यापुर्वीच सोमनाथ चॅटर्जी यांनी सभापतीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्या पक्षाची होती. तसेच सरकारविरोधात विश्वासदर्शक ठरावामध्ये मतदान करावे अशीही विनंती त्यांना पक्षातर्फे करण्यात आली होती.
मात्र पक्षाची ही विनंती सोमनाथ चॅटर्जी यांनी मान्य केली नाही. त्यांनी लोकसभेच्या सभापतीपदी कायम राहाण्याचा निर्णय घेतला. महिन्याभरात त्यांना पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल पक्षामधून बाहेर काढण्यात आले. तेव्हा, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखदायक दिवस आहे' अशा शब्दांमध्ये चॅटर्जी यांनी प्रतिक्रिया दिली होती.
1996 साली चॅटर्जी यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चॅटर्जी यांच्या विरोधकांनीही, सोमनाथबाबूंनी लोकसभेचे संचालन अत्यंत निःपक्षरित्या केले आणि ते एक उत्तम सभापती होते असे कौतुक केले आहे.