सोमनाथ यांचे वर्तन लज्जास्पद, त्यांनी समर्पण करावे - केजरीवाल
By admin | Published: September 23, 2015 09:30 AM2015-09-23T09:30:15+5:302015-09-23T11:07:53+5:30
सोमनाथ भारती यांचे वागणे पक्ष व कुटुंबासाठी लज्जास्पद असून त्यांनी पोलिसांपासून लांब न पळता समर्पण करून त्यांना सहकार्य करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अटकेच्या भीतीने लांब पळणारे 'आप'चे आमदार व माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांसमोर समर्पण करावे, असा सल्ला 'आप'चे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ' सोमनाथ यांनी पोलिसांसमोर समर्पण केले पाहिजे. ते लांब का पळत आहेत? जेलमध्ये जाण्याची त्यांना एवढी भीती का वाटत आहे? आता त्यांचे वागणे पक्ष व कुटुंबांसाठी लज्जास्पद ठरत आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे' असे ट्विट करत केजरीवाल यांनी सोमनाथ भारतींना फटकारले आहे.
'आप'चे आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. याप्रकरणी त्यानंतर पोलिसांनी भारती यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाण, फसवणूकीसह अनेक गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच भारती यांनी दिल्ली कनिष्ठ न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत भारतींविरोधात अटक वॉरंट काढले होते. या निर्णयाला भारती यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले, त्यावर आज झालेल्यासुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही आधीचा निर्णय कायम ठेवत भारतींना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा शोधही सुरू केला, मात्र ते त्यांच्या निवासस्थानी असल्याने काल त्यांना अटक करता आली नाही.