CoronaVirus: 'वडिलांचा हात कापला गेल्याची बातमी आईला दिसू नये म्हणून मी टीव्हीच बंद केला'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:49 PM2020-04-13T13:49:00+5:302020-04-13T13:50:18+5:30
coronavirus पंजाबच्या पटियालामध्ये निहंगांचा पोलिसांवर हल्ला; उपनिरीक्षकाचा हात शरीरापासून वेगळा
चंदिगढ: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर काल पंजाबमध्ये हल्ला झाला. पटियालामध्ये निहंगांनी केलेल्या हल्ल्यात उपनिरीक्षक हरजीत सिंह यांचा हात कापला गेला. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमधल्या डॉक्टरांना हरजीत सिंह यांचा हात जोडण्यात यश आलं. हरजीत यांच्या कुटुंबानं या संकटाचा मोठ्या धीरानं सामना केला.
हरजीत पत्नी बलविंदर कौर आणि मुलगा अर्शप्रीत यांच्यासोबत राहतात. तर हरजीत यांचे आई-वडील त्यांचे लहान बंधू गुरजीत यांच्या सोबत वास्तव्यास आहेत. एका हिंदी वृत्तसंकेतस्थळानं गुरजीत यांच्याशी संवाद साधला. 'माझे मोठे बंधू हरजीत सिंग (४८) पटियालाच्या सदर पोलीस ठाण्यात काम करतात. तर मी तिथपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपुरामध्ये राहतो. काल सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मला एका मित्राचा फोन आला. हरजीतचा हात कापला गेल्याची माहिती त्यानं मला दिली. ते ऐकून मला प्रचंड धक्का बसला. मी तातडीनं घरातून निघालो. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात वेदना दिसत नव्हती. त्याच्यावर उपचार सुरू होते,' असं गुरजीत यांनी सांगितलं.
आम्ही कुटुंबियांना याबद्दलची माहिती दिली नाही. वहिनींना (हरजीत यांची पत्नी) प्रचंड मोठा मानसिक धक्का बसेल, अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी त्यांना फोनच केला नाही. मात्र अर्शदीपनं टीव्हीवर सगळं पाहिलं होतं. त्यानं मला फोन करून सर्व सांगितलं. आईला याबद्दल कळू नये म्हणून त्यानं टीव्हीची केबल काढली होती. मी आमच्या आई-वडिलांनाही याबद्दलची माहिती संध्याकाळी दिली, अशी आपबिती गुरजीत यांनी सांगितली.
लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाबद्दल गुरजीत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. त्यांच्यासोबत केलं जाणारं वर्तन अशोभनीय आणि संतापजनक असल्याचं गुरजीत म्हणाले.
नेमकी घटना काय?
पटियालाच्या भाजी मंडईत जाणारी काल काल पोलिसांनी रोखली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबवलं आणि कर्फ्यू पासबद्दल विचारणा केली. मात्र ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात हरजीत सिंग यांचा हात कापला गेला. सिंग यांचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.