पुत्र फॉर्म्युला राज्यसभेत
By admin | Published: May 1, 2015 01:44 AM2015-05-01T01:44:42+5:302015-05-01T01:44:42+5:30
योगगुरु व हरियाणा सरकारचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या ‘दिव्य पुत्रबीजक’ नामक औषधावरून राज्यसभेत गुरुवारी जोरदार गोंधळ झाला.
संसदेत गोंधळ : सरकारने दिले कारवाईचे आश्वासन
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
योगगुरु व हरियाणा सरकारचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या ‘दिव्य पुत्रबीजक’ नामक औषधावरून राज्यसभेत गुरुवारी जोरदार गोंधळ झाला. आरोग्यमंत्री ्रजे.पी. नड्डा यांनी या प्रकरणाच्या कारवाईचे आश्वासन दिले. या आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यानंतर मुलगाच होतो, या दाव्यासह संबंधित औषधाची विक्री सुरू असल्याचा आरोप आहे. जनता दल (युनायटेड)चे के.सी. त्यागी यांनी शून्यप्रहरादरम्यान सभागृहात हा मुद्दा उपस्थित करीत, याप्रकरणी कारवाईची मागणी केली.
त्यागी यांनी सभागृहात ‘दिव्य पुत्रबीजक’ औषधाचे एक पाकीट दाखवले. औषधाचे हे पाकीट आपण दिव्य फार्मसीमधून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या औषधाच्या सेवनाने पुत्रप्राप्ती होते, असा दावा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्य फार्मसीतून औषध खरेदी केल्याची पावती दाखवत, या निमित्ताने त्यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. भाजपाप्रणित रालोआ सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या गोष्टी करते. त्याचवेळी हरियाणा सरकारद्वारे नियुक्त बॅ्रण्ड अॅम्बेसडर पुत्रप्राप्तीची औषधे विकतात. पुत्रप्राप्तीची औषध विक्री अवैध आणि घटनाबाह्ण असल्याचा आरोप त्यांनी केला.
सपाच्या जया बच्चन यांनी के.सी. त्यागी यांच्याकडून औषधाचे ते पाकीट घेऊन आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांना दिले. नामनियुक्त सदस्य जावेद अख्तर, सपाचे नरेश अग्रवाल, माकपाचे सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी त्यागींना पाठिंबा दर्शवला.
यानंतर नड्डा यांनी हा मुद्दा आयुष विभागांतर्गत येत असल्याचे सांगत या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. लिंग गुणोत्तरामधील तफावत गंभीर आहे. सरकार याबाबत चिंतित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाची निगराणी करीत आहेत, असे ते म्हणाले.
पतंजली योगपीठात ‘पुत्रवती’ नामक औषधाच्या विक्रीवरून मोठा वाद यापूर्वीही निर्माण झाला होता. २००७ मध्ये उत्तराखंड सरकारच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशीही झाली होती. यानंतर या औषधाची विक्री थांबविण्यात आली होती.
पतंजली योगपीठाच्या संकेतस्थळावर औषधांची यादी दिली आहे. या यादीत पुत्रप्राप्तीसाठीच्या या औषधाच्या नावाचाही समावेश आहे. वादानंतर दिव्य फार्मसीच्या या औषधाचे नाव बदलून ‘पुत्रजीवक बीज’ करण्यात आले होते.