एकुलत्या एक मुलाने केली पोलीस शिपाई बापाची हत्या; गाडीची चावी न दिल्याने छातीवर केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:50 PM2024-09-26T13:50:37+5:302024-09-26T13:52:04+5:30
उत्तर प्रदेशात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने क्षुल्लक कारणावरुन वडिलांची चाकूने वार करुन हत्या केली.
UP Crime : उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये अल्पवयीन मुलाने शिक्षिका आईसमोर हेड कॉन्स्टेबल असलेल्या वडिलांची हत्या केली. कारण एवढेच होते की वडिलांनी गाडीची चावी देण्यास नकार दिला होता. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने त्याच्या वडिलांच्या छातीवर चाकूने अनेक वार केले. हे वार इतके जोरदार होते की त्यामुळे वडिलांच्या हृदयाला जखमा झाल्या. जखमी वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. या सगळ्या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या हेड कॉन्स्टेबल वडिलांची चाकूने हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाने वडिलांची हत्या केल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली. बुलंदशहर कोतवाली देहाट परिसरातील यमुनापुरम कॉलनीती हा सगळा प्रकार घडला. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने कारची चावी न दिल्याने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला. जखमी प्रवीण कुमार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वाटेतच प्रवीण कुमार यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा मृत प्रवीण कुमार यांची पत्नी व सासरे घरी उपस्थित होते.
घटनेची माहिती देताना मृताचे सासरे विशंभर दयाळ यांनी सांगितले की, "हा सगळा प्रकार घडला तेव्हा ते घरीच होते. प्रवीणचा मुलगा बाहेर फिरून येण्यासाठी गाडीच्या चाव्या मागत होता. मात्र प्रवीण नकार देत होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच तो रात्रभर कार घेऊन कुठेतरी गेला होता. त्यामुळेच प्रवीण आपल्या मुलाला कार देण्यास नकार देत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर प्रवीणच्या मुलाने रागाच्या भरात भाजी कापण्याचा चाकू आणून प्रवीणच्या छातीत वार केला. चाकू थेट प्रवीणच्या हृदयात घुसला. चाकूच्या जखमेमुळे रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर प्रवीण जमिनीवर कोसळला. प्रवीणला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला."
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हेड कॉन्स्टेबल प्रवीण कुमार पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तैनात होते. ग्रामीण भागातील यमुना पुरम येथे ते कुटुंबासह राहत होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा नोंदवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच खून केलेल्या मुलावर कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.
अल्पवयीन आरोपी हा शहरातल्या एका नामांकित शाळेत शिकत आहे. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आरोपी मुलाची आई ही एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वीच तिची बुलंदशहर येथे बदली झाली होती. "नातवाची संगत ठीक नव्हती. त्याचे आई वडील याआधीही त्याला बाहेर जाण्यापासून थांबवत होते. यावरुनच त्याचे पालकांशी भांडण होत होतं. पण तो एवढं मोठं पाऊल उचलेल असं कोणालाच वाटलं नव्हते," असे विशंभर दयाळ यांनी म्हटलं.
"दहावीच्या परीक्षा असल्याने प्रवीण कुमार यांनी त्यांची बदली बुलंदशहर येथे करुन घेतली होती. घटनेच्या एक दिवस आधीच मुलगा कार घेऊन बाहेर गेला होता.त्यानंतर सकाळी ४ वाजता घरी पोहोचला होता. अनेक नवस केल्यानंतर हा मुलगा जन्माला आला होता आणि त्याने वडिलांसोबत असं केलं," अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.