मुलाला हौतात्म, सून सारं काही घेऊन गेली, कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी मांडली व्यथा, केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:14 PM2024-07-12T14:14:25+5:302024-07-12T14:19:56+5:30
Captain Anshuman Singh Family: गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या कुटुंबामध्ये मतभेद झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
गतवर्षी सियाचिनमध्ये लष्कराच्या एका तळावर लागलेल्या आगीत सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म आलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव म्हणून नुकतंच कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते या कीर्तिचक्राचा स्वीकार अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि आईने केला होता. मात्र या सन्मानानंतर अंशुमन सिंह यांच्या कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी हुतात्मा अंशुमन यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. आमच्या मुलाला हौतात्म्यं आलं. मात्र आता सारं काही सून घेऊन गेली, असा आरोप त्यांनी केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह आणि आई मंजू देवी यांनी ५ जुलै रोजी कीर्ती चक्र सन्मानाचा स्वीकार केला होता. मात्र नंतर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, आमच्या मुलाला वीरमरण आलं. मात्र आम्हाला काही मिळालं नाही. सन्मान आणि मदत म्हणून मिळालेली रक्कम सून घेऊन गेली. आमचा मुलगाही गेला आणि सूनही गेली.
अंशुमन सिंह यांचे वडील रवी प्रताप सिंह यांनी यावेळी सांगितले की, ‘नेक्ट टू किन’साठी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीची चर्चा केली आहे. त्याशिवाय दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीवेळीही मी यामध्ये बदल करण्याविषयी बोललो होते. वीरमरण येण्यापूर्वी पाच महिने आधीच माझ्या मुलाचं लग्न झालं होतं. त्याला मुलबाळ नाही. त्यामुळे आज आमच्याकडे त्याच्या फोटोशिवाय काहीही उरलेलं नाही.
दरम्यान, अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी दावा केला की, त्यांची सून आता त्यांना सोडून गेली आहे. तसेच तिने आपला पत्ताही बदलला आहे. कीर्तिचक्र स्वीकारताना अंशुमनची आई सोबत होती. मात्र आता आमच्या मुलाच्या फोटोवर लावण्यासाठी आमच्याकडे काहीही नाही आहे. आमच्यासोबत जे काही घडलंय, ते कुणासोबतही घडता कामा नये. मात्र हुतात्मा अंशुमन सिंह यांच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांच्या पत्नीकडून कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.