DY Chandrachud: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. चंद्रचूड भूषवणार सर्वाेच्च पद; ५० वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:23 AM2022-10-12T06:23:38+5:302022-10-12T06:24:11+5:30
न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे.
नवी दिल्ली : सरन्यायाधीश यू. यू. लळित यांनी उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस मंगळवारी केंद्राला केली. ती स्वीकारल्यानंतर न्या. चंद्रचूड ९ नोव्हेंबर रोजी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेऊ शकतात.
न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांची १३ मे २०१६ रोजी पदोन्नतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
ते देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काल भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. देशात पहिल्यांदाच या पदावर सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीच्या मुलाची निवड होत आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेत एलएलएम, पीएच.डी.
अर्थशास्त्रात बीए ऑनर्स पदवीनंतर न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून विधी पदवी मिळवली. अमेरिकेच्या हॉर्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पदवी व न्याय वैद्यक शास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. मुंबई विद्यापीठात घटनात्मक कायदा विषयाचे अतिथी व्याख्याता म्हणून अध्यापन कार्य केले.
कर्नाटक मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. प्रसन्न वराळे
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याविषयी गेल्या २८ सप्टेंबर रोजी शिफारस केली होती. न्या. वराळे औरंगाबाद जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.