दुर्दैवी! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही आईच्या पार्थिवाला अग्नी देण्यास मुलाचा नकार, बहिणींचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:13 PM2021-05-22T15:13:22+5:302021-05-22T15:13:42+5:30
रांचीतील एका गावातून आई-मुलाच्या रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलानं चक्क आपल्या आईच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
देशाता कोरोना संकटात आता दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ३ लाखाच्या खाली आला आहे. पण कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. यातच रांचीतील एका गावातून आई-मुलाच्या रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलानं चक्क आपल्या आईच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. इतकंच काय तर आईच्या मृत्यूनंतर मुलानं आईचा चेहरा देखील पाहण्यास नकार दिला.
रांचीच्या कांके प्रखंडमधील चेवे खटंगा येथील ही घटना आहे. गावातील एका महिलेचा आजारामुळे मृत्यू झाला आणि तिचं पार्थिव अॅम्ब्युलन्सनं राहत्या घरी आणण्यात आलं. पण अनेक तास मृतदेह अॅम्ब्युलन्समध्येच पडून होता. मृत्यू झालेल्या महिलेच्या पोटच्या मुलानं दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्याच्या दोन बहिणी घराचा दरवाजा ठोठावून भावाकडे आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची विनवणी करत होत्या. पण मुलानं कुणाचंच ऐकलं नाही. त्यानं आईचा चेहरा देखील पाहणं पसंत केलं नाही.
एकदा दरवाजा उघड आणि आईचं तोंड बघ. तिचा कोरोना रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. आईची शेवटची इच्छा तरी पूर्ण कर आणि तुझ्या हातानं अग्नी दे, अशी विनवणी त्याच्या बहिणी करत होत्या. घराच्या दरवाजाबाहेर बसून त्या रडत होत्या आणि भावाला दरवाजा उघडण्याची विनंती करत होत्या. पण मुलानं अजिबात ऐकलं नाही. दरवाजा अजिबात उघडणार नाही असं त्यानं सांगितलं.
५५ वर्षीय सांझो देवी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आपल्या आईला कोरोनाची लागण झाली आहे, असा संशय मुलाला होता. त्यामुळे मुलगा आपल्या आईची विचारपूस देखील करण्यासाठी गेला नाही. शुक्रवारी सांझो देवी यांचं निधन झालं आणि त्यांच्या दोन मुली आईचं पार्थिव घेऊन घरी आल्या. पण मुलानं पार्थिव घरी आणण्यास नकार दिला. बहिणींनी खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर सांझो देवी यांच्या मुलींनीच अंत्यसंस्कार केले.