तब्बल 20 वर्षानंतर घेतला वडिलांच्या मृत्यूचा सूड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 02:59 PM2017-07-26T14:59:18+5:302017-07-26T14:59:49+5:30
राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता
गुरुग्राम, दि. 26 - सेक्टर 69 मध्ये राहणा-या एका प्रॉपर्टी डिलरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांपुर्वी दोन कुटुंबात झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकुमार असं हत्या झालेल्या पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता. 20 वर्षांपुर्वी ही हत्या झाली होती.
पोलिसांनी दिपकविरोधात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद केला आहे. राजकुमार रात्री 11 वाजता सोहना रोड येथील आपल्या कार्यालयामधून घरी जात असताना चार ते पाच जणांनी त्यांचा पाठलाग केला. गाडी अडवून गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. जवळपास आठ गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. छाती, डोकं आणि पायावर गोळ्या झाडण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बादशहापूर येथे इस्कॉन टेम्पलजवळ राजकुमार यांच्या गाडीचा एका गाडीने पाठलाग सुरु केला होता. आपल्या गाडीचा पाठलाग होत असल्याचं राजकुमार यांनी कदाचित ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी गाडी वेगाने चालवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांची गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. यानंतर आरोपींनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यानंतरही राजकुमार गाडीतून निघून सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. जवळच्या एका घरात जाऊन ते लपले मात्र आरोपींनी त्यांचा शोध घेतला आणि गोळ्या घालून हत्या केली'.
राजकुमार यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याच गावात राहणा-या दिपकविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपींनी वापरलेली कार जप्त केली आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत.
'राजकुमार यांच्या वडिलांनी आठ जणांची नावं दिली असून आम्ही त्यांची तपासणी करत आहोत', अशी माहिती पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार यांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं तयार केली आहेत.
राजकुमार यांना दिपकचे वडिल ब्रम्हप्रकाश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन महिने कारागृहात घालवल्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. दोन्ही कुटुंबांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुटका करण्यात आली होती.