सोनल मानसिंग, राकेश सिन्हा यांच्यासह चार जण राज्यसभेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:24 AM2018-07-15T04:24:54+5:302018-07-15T04:25:05+5:30
प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि दलित समुदायातील शेतकरी नेते राम शकल यांचीही राज्यसभेवर वर्णी लागली आहे. पंतप्रधानांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्त्यांमुळे शरद यादव यांची एक जागा वगळता राज्यसभेच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. नियुक्त सदस्यांचा कालावधी सहा वर्षे असेल. राज्यसभेवर १२ नियुक्त सदस्य असतात. त्यापैकी ११ जणांच्या नेमणुका मोदी सरकारने केल्या आहेत. फेब्रुवारी २०१४ मध्ये नियुक्त झालेले कायदेतज्ज्ञ के. टी. एस. तुलसी हे एकमेव सदस्य मागील संपुआ सरकारच्या काळातील आहेत.
राम शकल (५५) उत्तर प्रदेशातील असून, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा तीनदा ते लोकसभा सदस्य होते. दलित समुदायाकडे लक्ष आहे, असा संदेश त्यांच्या नियुक्तीने मोदी सरकार देऊ इच्छिते. संघाशी संबंधित राकेश सिन्हा टीव्ही वाहिन्यांवर मोदी सरकारचे समर्थन करताना दिसतात, तर ७५ वर्षीय सोनल मानसिंग गुजराती असून, त्या भरतनाट्यम व ओडिशी नृत्यात पारंगत आहेत. रघुनाथ मोहापात्रा (७५) ओडिशातील पाषाण शिल्पकार आहेत.
या नेमणुकानंतर राज्यसभेतील रालोआचे संख्याबळ ११० होईल. सुब्रमण्यम स्वामी, रूपा गांगुली, सुरेश गोपी व संभाजी राजे, या नामनियुक्त सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मेरी कोम (मणिपूर), स्तंभलेखक स्वपन दासगुप्ता (प. बंगाल) आणि नरेंद्र जाधव (महाराष्ट्र) हे सदस्यही कसोटीच्या काळात रालोआसोबत असतील, असे दिसते.
उपसभापतीपदाच्या विजयासाठी एकूण १२३ मतांची गरज आहे. बीजदला उपसभापतीपद देऊन आपल्या बाजूने वळविण्याची खेळी भाजपा खेळू शकते. उपसभापतीपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनापर्यंत पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरू आहे.
>सहमतीचे प्रयत्न
उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सहमती व्हावी, असे भाजपाला वाटते. यासाठी भाजपाने आटोकाट प्रयत्न सुरु केले आहेत. या २४४ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे ११० सदस्य आहेत. निवडणूक झाल्यास बीजदचे ९, टीआरएसचे ६ आणि वायएसआर-काँग्रेसचे दोन सदस्य महत्त्वाची भूमिका बजावतील. विजयासाठी १२३ मतांची गरज आहे.