सोनाली यांना बळजबरीने पाजले ड्रग्ज, अखेर साथीदारांनी दिली कबुली; CCTV फुटेज हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:36 AM2022-08-27T05:36:36+5:302022-08-27T05:37:07+5:30
भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी कबूल केले.
पणजी :
भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांना जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी कबूल केले. एवढेच नव्हे तर सोनाली यांची मालमत्ता हडप करण्याच्या व त्यांचे राजकीय करिअर संपविण्याच्या उद्देशानेच खून केल्याचा पोलीस चौकशीत समोर आले आहे. गुरुवारी रात्री दोघांना अटक केली. त्यांना कोठडीसाठी न्यायालयात उभे केले जाईल, असे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले.
सोनाली यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी मात्र तसे काहीच दिसलेले नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करणार आहेत. दरम्यान, सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी यशोधराने तिच्या चुलतभावासह चितेला अग्नी दिला.
स्वच्छतागृहात नेताना जखमा झाल्या
सोनाली, सुखविंदर व सुधीर हे तिघे कर्लीस क्लबमध्ये गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांनी सोनाली यांना ड्रग्ज असलेले पेय जबरदस्तीने दिल्याचे दिसते. तब्येत बिघडल्याने दोघांनी सोनाली यांना स्वच्छतागृहात नेले. तिथेच तिघे जवळपास २ तास थांबले. नेताना त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचे दोघांनी कबूल केले आहे.
- ओमवीर सिंग, पोलीस महानिरीक्षक